Weather Update : खान्देशातील जळगावसह धुळे, नंदुरबार जिल्ह्यात आज विजांसह पावसाची शक्यता !
Weather Update : राज्याच्या बऱ्याच भागात पावसाने आता उघडीप दिली आहे. तुरळक ठिकाणी हलक्या सरी अधुनमधून कोसळत आहेत. दरम्यान, हवामान विभागाने आज गुरूवारी (ता.१५) खान्देशातील नंदुरबार, धुळे, जळगाव, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. उर्वरित राज्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे.
Weather Update: Chance of rain with lightning today in Dhule, Nandurbar district along with Jalgaon in Khandesh!
बुधवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पावसाने उघडीप दिली होती. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. पावसाच्या उघडिपीने उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. कमाल तापमान पुन्हा तिशीपार पोहोचले असून, सोलापूर येथे उच्चांकी ३५.६ अंश तापमानाची नोंद झाली. ईशान्य राजस्थान आणि परिसरावर ५.८ किलोमीटर उंचीवर, तसेच दक्षिण गुजरात आणि परिसरावर १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या भागांमध्ये वातावरणातील बदल आणि पावसाची शक्यता अधिक वाढली आहे. मॉन्सूनची रेषा राजस्थानमधील बिकानेरपासून सुरू होऊन ओराई, सिधी, रांची, दिघा मार्गे पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे, ज्यामुळे या प्रदेशांमध्ये पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.
पुढील काही दिवसांमध्ये पाऊस आणि हवामानात बदल शक्य
केरळच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रातही समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या चक्राकार वाऱ्यांमुळे केरळच्या किनारी भागात पावसाच्या शक्यतेत वाढ झाली आहे. या स्थितीमुळे दक्षिण-पश्चिम मॉन्सून आणखी सक्रिय होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये विविध भागांत पाऊस आणि हवामानातील बदल दिसून येऊ शकतात, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.