Weather Update : राज्यात पावसाचा जोर ओसरल्यानंतर अनेक भागात आता उघडीप मिळण्याची शक्यता !
Weather Update : राज्यातील पावसाचा जोर हळूहळू कमी होत असून, अनेक भागात आता पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरीही आज मंगळवारी (ता.६ ऑगस्ट) हवामान विभागाने कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसह पुणे व सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. विदर्भात सुद्धा विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. मात्र, उर्वरित राज्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Weather Update: After the rain subsided in the state, there is a possibility of clearing in many areas!
आग्नेय राजस्थान आणि परिसरावरील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता निवळू लागले आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानमधील फालोदी पासून कमी दाबाच्या क्षेत्राचे केंद्र ते चुर्क, पुरुलिया, दिघा आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. या कमी दाबाच्या केंद्रामुळे हवेच्या दबावात कमी येऊन त्यापासून उत्तर ओडिशापर्यंत एक हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यासोबतच दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनाऱ्याला समांतर असा आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे समुद्रकिनारी आणि या पट्ट्यांलगतच्या भागांत पावसाची तीव्रता वाढू शकते. या हवामानाच्या बदलामुळे समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला आहे पावसाचा इशारा
आग्नेय राजस्थान आणि परिसरातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निवळू लागले असले तरी मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे हवामानातील अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे सतर्क राहून हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. दरम्यान, हवामान विभागाने आज मंगळवारसाठी रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात विजांसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.