जुलै महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज…खान्देशात कशी राहील स्थिती ?
जळगाव टुडे । राज्यात सर्वदूर कमी अधिक प्रमाणात पावसाची अधुनमधून हजेरी लागत आहे. पावसाला पोषक हवामानामुळे आज मंगळवारी (ता.२) देखील कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, जुलै महिन्यातील पावसाचा अंदाज सुद्धा हवामान विभागाचे महासंचालक डॉ.मृत्युंजय महापात्रा यांनी जाहीर केला आहे. ( Weather Update )
डॉ. महापात्रा यांनी म्हटल्यानुसार, जून महिन्यात देशात सरासरी १६५.३ मिलिमीटर पाऊस पडतो. परंतु, यंदा जूनअखेर सरासरी १४७.२ मिलिमीटर म्हणजेच ८९ टक्केच पाऊस पडलेला आहे. मात्र, जुलै महिन्यात यंदा राज्याच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. जून महिन्यात पावसाने जेमतेम सरासरी देखील गाठलेली नसून, पावसाचे असमान वितरण असल्याचे दिसून आले आहे. जुलै महिन्यातील चांगल्या पावसाचा अंदाज शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकणार आहे. विशेषतः खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार तसेच मराठवाड्याच्या उत्तर भागात सरासरी इतका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जुलै महिन्यात देशाच्या बहुतांश भागात सरासरी इतक्या किंवा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. ईशान्य भारत, वायव्य भारत आणि पूर्व भारताचा काही भाग आणि दक्षिण द्वीपकल्पाच्या आग्नेय भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. सन १९७१ ते २०२० या कालावधीतील नोंदीनुसार जूलै महिन्यात देशात २८०.४ मिलिमीटर पाऊस पडलेला आहे.