जळगावसह धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यात आज कशी राहील पावसाची स्थिती ?
हवामान विभागाने जाहीर केला अंदाज
जळगाव टुडे । मॉन्सून सक्रीय झाल्याने राज्यभरात ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज रविवारी (ता.२३) देखील अनेक भागासाठी जोरदार पावसाचा रेड, ऑरेंज व येलो अलर्ट हवामान विभागाने जारी दिला आहे. याशिवाय काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. खरिपाच्या पेरण्या बाकी राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. ( Weather Update )
मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता वाढल्याने कोकणासह घाटमाथ्यावर आज रविवारपासून (ता.२३) पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, आज कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय रत्नागिरी, सातारा व कोल्हापुरात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुणे, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
या जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा
दरम्यान, आज रविवारी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव तसेच धुळे, नंदुरबार, नगर जिल्ह्यात आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, विदर्भातील वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि सोलापूर, सांगली, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.