सावधान, आजपासून राज्याच्या काही भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता
बाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन
Jalgaon Today : हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मंगळवारी (ता. 30) राज्याच्या काही भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट सुद्धा देण्यात आला आहे. त्यानंतर दोन दिवस राज्यात सामान्य वातावरण पाहायला मिळणार आहे. मात्र, 3 मेपासून राज्यात पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हात घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Weather Update)
राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका वाढला आहे. त्यातच महाराष्ट्रात पुढील 24 तासांत उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम आहे. राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. त्यातच कुठे ऊन तर कुठे पाऊस अशी परिस्थिती असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
पुढील 24 तासात पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात कोरडे वातावरण पाहायला मिळणार आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा या भागातही दमट आणि कोरडे वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट येणाचा अंदाज वर्तवला आहे. तर दुसरीकडे कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.