विदर्भात आज मंगळवारी गारपीट तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट
आकाशात अवकाळी पावसाचे ढग कायम
Weather Update : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार सोमवारी (ता.22) बऱ्याच भागात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, आज मंगळवारी (ता.23) देखील विदर्भात गारपीट तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. राज्याच्या अन्य भागात मात्र कोरडे उष्ण हवामान कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार सद्यःस्थितीत दक्षिण छत्तीसगडपासून विदर्भापर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे कर्नाटक ते दक्षिण केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा देखील सक्रीय झाला आहे. परिणामी, महाराष्ट्रात अवकाळी पावसाला पोषक वातावरणाची निर्मिती झाली आहे. दरम्यान, आज मंगळवारी (ता.23) सुद्धा विदर्भात गारपीट तसेच मध्य महाराष्ट्रातील जिल्हे तसेच मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
सोमवारी (ता.22) या जिल्ह्यात घेण्यात आली अवकाळी पावसाची नोंद
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता.22) विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात 5.2 मिमी, गडचिरोलीत 2.0 मिमी, गोंदियात 4.2 मिमी, वर्ध्यात 2.6 मिमी, यवतमाळमध्ये 4.1 मिमी, ब्रम्हपुरीत 2.2 मिमी, अमरावतीत 1.0 मिमी, अकोल्यात 0.2 मिमी, नांदेडमध्ये 0.4 मिमी, धाराशिवमध्ये 2.5 मिमी, उदगीरमध्ये 3.0 मिमी, साताऱ्यात 0.5 मिमी, सोलापूरमध्ये 4.0 मिमी पाऊस पडला.