विदर्भात गारपीट तसेच जळगावसह धुळे, नाशिक जिल्ह्यात आज सोमवारी वादळी पावसाची शक्यता
Weather Update : दक्षिण भारतात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्यानंतर राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाळी वातावरणाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने सोमवारी (ता.22) विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा तसेच यवतमाळ जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक, नगर जिल्ह्यात आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पावसाळी वातावरणाची निर्मिती झाल्यानंतर कुठे जोरदार तर कुठे हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे कमाल तापमानात दोन ते तीन अंशाने घट झालेली असली तरी आर्द्रता वाढल्याने उकाडा देखील तितकाच वाढलेला आहे. रब्बी हंगामातील पिकांची काढणी आटोपल्यानंतर शेतकरी आता उन्हाळी पिकांकडे वळले आहेत. दुर्दैवाने हातातोंडाशी घास आलेला असताना नेमका अवकाळी पाऊस गर्दी करू लागल्याने संबंधित सर्व शेतकऱ्यांच्या पायाखालची जमिनच सरकली आहे. सध्या शेती शिवाराच उन्हाळी भूईमूग, बाजरी, मका यासारखी पिके उभी आहेत. त्यांना अवकाळी पाऊस व गारपिटीचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यातील या भागात पावसाची हजेरी
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (ता.21) राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात 13.8 मिलीमीटर तसेच महाबळेश्वर येथे 24.8 मिलीमीटर, पुण्यात 2.2 मिलीमीटर, सोलापुरात 8.0 मिलीमीटर, यवतमाळमध्ये 2.1 मिलीमीटर, छत्रपती संभाजीनगरात 16.2 मिलीमीटर, बीडमध्ये 2.2 मिलीमीटर, नांदेडमध्ये 9.8 आणि रत्नागिरीत 0.5 मिलीमीटर पावसाची नोंद घेण्यात आली.