जळगाव तसेच धुळे, नाशिक जिल्ह्यात आज शनिवारी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट
Weather Update : उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक तसेच नगर, पुणे, सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये आज शनिवारी (ता.20) वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.
प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्रातील मराठवाडा भागात समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे कर्नाटकासह तमिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. राज्यातही पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता.19) विदर्भातील अकोल्यात सर्वाधिक 44.0 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. तसेच वाशिममध्ये 43.6, परभणीत 42.2, खान्देशातील जळगावमध्ये 43.2 अंश सेल्सिअस, मालेगावात 42.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. एरवी आल्हाददायक वातावरणासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकमध्येही दिवसाचे कमाल तापमान 39.4 अंशापर्यंत गेले होते.