महाराष्ट्रातील काही भागात आज बुधवारी गारपीट होण्याचा हवामान खात्याचा इशारा
Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावलेली असताना, बुधवारी (ता.10) देखील काही भागात गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, भर उन्हाळ्यात निर्माण झालेल्या पावसाळी वातावरणामुळे कमाल तापमानात आचा बऱ्यापैकी घट झाली आहे. मात्र, आर्द्रता वाढल्याने उकाड्यातही तितकीच वाढ झाली आहे.
शेजारच्या मध्य प्रदेशात गेल्या तीन दिवसांपासून गारपिटीसह पाऊस पडत आहे. हवामान खात्याने बुधवारी (ता.10) भोपाळ, जबलपूर, उज्जैनसह 27 जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्या भागात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळ वाहण्याची शक्यता वाढलेली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातही मंगळवारी (ता.09) वादळी पाऊस पडल्याने केळीबागांसह मका व ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले.
प्राप्त माहितीनुसार दोन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय असल्याने उन्हाळ्यातही अनेक भागात पाऊस आणि गारपीट होत आहे. बुधवारी (10 एप्रिल) मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे रब्बी पिकांच्या काढणीसाठी धावपळ करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.