जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
Weather Info : उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी शुक्रवारी (ता.29) दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यावेळी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असा इशारा आयएमडी मुंबई यांनी दिला आहे.
दरम्यान, हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले होते. जळगाव शहर व परिसरात साधारणतः दहा वाजेच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी देखील कोसळल्या. अचानक सुरू झालेल्या पावसाने रब्बी हंगामातील ज्वारी तसेच गव्हाच्या काढणीत व्यस्त असलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. अनेकांना मळणीची कामे थांबवून धान्य ओले होऊ नये म्हणून त्यावर ताडपत्री झाकण्याची व्यवस्था करावी लागली. दरम्यान, वातावरणातील दमटपणा वाढून अंगातून घामाच्या धारा निघू लागल्याने पावसाळी वातावरणाची अनुभूति भर उन्हाळ्यात आली.