जळगाव जिल्ह्याच्या तापमानाचा पारा येत्या पाच दिवसात 47 अंशापर्यंत जाणार ?
जळगाव टुडे । जिल्ह्यातील तापमान अपवाद वगळता गेल्या महिनाभरापासून 42 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्तच राहिले आहे. तशात हवामान विभागाने आगामी पाच दिवसात जळगाव जिल्ह्याच्या तापमानाचा पारा हा 47 अंशापर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांना खूपच काळजी घ्यावी लागणार आहे. (weather Alert)
जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वीच वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली होती. प्रत्यक्षात आकाशात तुरळक काळे ढग जमा होऊन वातावरणातील उकाडा वाढल्याची अनुभूती तेवढी आली. तसेच कमाल तापमान हे 42 अंश सेल्सिअसपर्यंत कायमच राहिले. सायंकाळी दिवस मावळल्यानंतरही म्हणजे साडेसात वाजेपर्यंत उन्हाच्या झळा कायम राहत असल्याने सध्याच्या घडीला आबाल व वृद्धांना दिवसा घराबाहेर पडणे देखील मुश्किल झाले आहे.
दरम्यान, हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आज रविवार (ता.19) पासूनच तापमानाचा पारा सतत वाढत जाणार असल्याचे म्हटले आहे. दररोज एक अंशाने वाढत जाणारे तापमान 23 मे पर्यंत 47 अंशापर्यंत पोहोचू शकते, असे स्कायमेट संस्थेने देखील नमूद केले आहे. त्यामुळे आगामी पाच दिवस खूपच सावधानीचे आणि काळजीचे असणार आहेत.