तापी नदीचा पाणी पुरवठा ठप्प…ममुराबाद ग्रामस्थांची पावसाच्या पाण्यावरच भिस्त !
जळगाव टुडे । तालुक्यातील ममुराबाद येथे तापी नदीवरून होणारा पाणी पुरवठा पंप जळाल्याने काही दिवसांपासून ठप्प झालेला आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून ग्रामस्थांना आता ट्युबवेलचे पाणी पाजले जात असले तरी त्यामुळे संपूर्ण गावाची तहान भागणे मुश्किल झाले आहे. अर्थातच, अतिशय कमी दाबाचा पाणी पुरवठा होत असल्याने बऱ्याच ग्रामस्थांना भर पावसाळ्यात टंचाईला तोंड द्यावे लागले आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे अनेकांना गच्चीवरील पावसाच्या पाण्यावरच दिवस काढावे लागत आहेत. ( Water shortage )
ममुराबाद सारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी नांद्रा खुर्द येथे तापी नदीच्या काठावर पंपिंगची व्यवस्था केली आहे. प्रत्यक्षात त्या ठिकाणच्या विहिरीवर असलेले प्रत्येकी २५ अश्वशक्तीचे तिन्ही पंप सध्या नादुरूस्त होऊन पडले असून, त्यांच्या दुरूस्तीसाठी ममुराबाद ग्रामपंचायतीकडून वेळीच पाऊल उचलण्यात न आल्याने तापीचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही नादुरूस्त पंप दुरूस्तीसाठी जळगावला रवाना केले आहेत. मात्र, ते कधी दुरूस्त होतील त्याबद्दल काहीच सांगता येणार नाही.
दरम्यान, तीन सबमर्सिबल पंप उपलब्ध असतानाही पाणी पुरवठा ठप्प झाल्यावर झोपेतून जागी झालेल्या ग्रामपंचायतीने आता त्यांच्या दुरूस्तीसाठी धावपळ केली आहे. आधीच दोन पंप तयार ठेवले असते तर पाणी पुरवठा ठप्प होण्याची वेळ आलीच नसती. बरं दुरूस्तीसाठी जळगावला पाठवलेले पंप दुरूस्त होऊन केव्हा येतील, याचीही काहीच शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे वेळ निभावून नेण्यासाठी ग्रामस्थांना नांद्रा येथील ट्युबवेलचे क्षारयुक्त पाणी सध्या पुरविले जात आहे. ग्रामस्थांमधून त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.