जळगाव जिल्ह्यात मोठ्या सिंचन प्रकल्पांमध्ये जेमतेम 28 टक्केच पाणीसाठा शिल्लक !

- तीव्र पाणी टंचाईचे संकट

जळगाव टुडे । आधीच कमी पर्जन्यमान आणि त्यात तापमान वाढीचे संकट ओढवल्याने जिल्ह्यातील मोठ्या सिंचन प्रकल्पांमध्ये आता फक्त 27.95 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. मध्यम प्रकल्पांची अवस्था तर जास्तच वाईट असून, त्यात जेमतेम 15.66 टक्के पाणीसाठा आताच्या घडीला शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आजचा पाणीसाठा हा तब्बल 10 टक्क्यांनी कमी असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. पावसाळा सुरू होण्यास अद्याप वेळ असल्याने उपलब्ध पाणीसाठा टिकविण्याचे मोठे आव्हान त्यामुळे प्रशासनासमोर आहे. (Water shortage)

जळगाव जिल्ह्यातील हतनूर तसेच गिरणा व वाघूर या मोठ्या प्रकल्पांची पाणी साठविण्याची क्षमता सुमारे 1027.10 दलघमी इतकी आहे. प्रत्यक्षात सद्यःस्थितीत तिन्ही प्रकल्पात 287.12 दलघमी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, तापी नदीवरील हतनूर धरणात आता फक्त 29 टक्के पाणीसाठा आहे, तर गिरणा धरणात 12.63 टक्के आणि वाघुरमध्ये 59.07 टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याचवेळी हतनुरमध्ये 45 टक्के, गिरणामध्ये 24 टक्के आणि वाघुरमध्ये 64.47 टक्के पाणीसाठा अस्तित्वात होता.

जळगाव जिल्ह्यातील अभोरा, मंगरूळ, सुकी, मोर, गूळ, बहुळा, बोरी, भोकरबारी, तोंडापूर, अग्नावती, अंजनी, मन्याड आणि शेळगाव बॅरेज या मध्यम प्रकल्पांची एकूण पाणीसाठा क्षमता सुमारे 314.25 दलघमी इतकी आहे. प्रत्यक्षात आजच्या घडीला सर्व मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त 15.66 टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. अनेक प्रकल्प मार्च महिन्यातच कोरडेठाक पडले होते, उर्वरित प्रकल्प देखील आता तळ गाठू लागले आहेत. चोपडा तालुक्यातील गूळ तसेच तापी नदीवरील शेळगाव प्रकल्प तसेच मोर, सुकी, अभोरा, मंगरूळ हे सिंचन प्रकल्प वगळता अन्य मध्यम प्रकल्पांची अवस्था खूपच चिंताजनक स्थितीत असल्याचे दिसून आले आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button