Vidhansabha Election : जळगाव जिल्ह्यातील ‘या’ बंडखोरांसाठी सहा वर्षांसाठी बंद होतील भाजपची दारे..?
Vidhansabha Election : जिल्ह्यातील बऱ्याच मतदारसंघात उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज झालेल्यांनी स्वपक्षाच्या विरोधात बंड पुकारले आहे. त्यात भाजपच्या बंडखोरांचाही समावेश असून, त्यांचे बंड थोपविण्याचे मोठे आव्हान महायुतीच्या नेत्यांसमोर आता उभे ठाकले आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाचे न ऐकणाऱ्या बंडखोरांसाठी भाजपची दारे सहा वर्षांसाठी बंद होतील, असा इशारा दिल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.
Vidhansabha Election : BJP’s doors will be closed for six years for ‘these’ rebels in Jalgaon district…!
विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या काही उमेदवारांनी नाराज होऊन अपक्ष अर्ज भरले आहेत. त्यांची समजूत काढण्यात येणार आहे. ९९ टक्के उमेदवार अर्ज मागे घेतील, जे उमेदवार ऐकणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. याचा परिणाम बंडखोरांवर किती होतो, ते अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी दिसून येणार आहे. विधानसभेच्या जळगाव शहर मतदारसंघात भाजपचे माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे आणि माजी नगरसेवक मयूर कापसे यांनी त्यांच्याच पक्षाचे उमेदवार आमदार सुरेश भोळे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
पाचोरा मतदारसंघातही भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार किशोर पाटील यांच्या विरोधात यंदा दुसऱ्यांदा अपक्ष उमेदवारी दाखल केला आहे. गेल्या वेळीही अमोल शिंदे यांनी आमदार पाटील यांना अपक्ष उमेदवारी करून कोंडीत पकडले होते. एरंडोलमध्ये भाजपचे माजी खासदार ए.टी.पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांच्या विरोधात अपक्ष अर्ज दाखल करून महायुतीची डोकेदुखी वाढवली आहे. अमळनेरमध्ये भाजप समर्थक माजी आमदार शिरीष चौधरी यांनी देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार मंत्री अनिल पाटील यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.