Vidhansabha Election : रणधुमाळीचे संकेत; विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आजपासून ४० दिवसांनी लागू ?
Vidhansabha Election : लोकसभेनंतर लगेचच विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागलेले असताना आजपासून बरोबर ४० दिवसांनी आचाहसंहिता लागू होईल, असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केले आहे. याशिवाय त्यांनी शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश देऊन संपर्कप्रमुखांना पाचसूत्री कार्यक्रम देखील दिला आहे.
Vidhansabha Election: Signals of War; Assembly election code of conduct applicable after 40 days from today?
लोकसभा निवडणुकीतील यशानंतर उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. त्याअनुषंगाने मुंबईतल सेनाभवनात झालेल्या बैठकीला राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांची उपस्थिती होती. गावागावात शाखा स्थापन करण्यापासून ते मतदार नोंदणी करण्यापर्यंतच्या सूचनाही उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिल्या. निवडणुकांना अवघे ४० दिवस उरले आहेत, म्हणजेच पुढच्या ४० दिवसात आचारसंहिता लागेल. त्यामुळे कामाला लागा आणि चांगले काम करा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्क प्रमुखांना दिल्या.
शिवसेना ठाकरे गटाकडून चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट दरम्यान भगवा सप्ताहाचे आयोजन करण्याचेही विधानसभा संपर्क प्रमुखांना सांगण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये विधानसभा क्षेत्राचा आढावा घेऊन त्याची माहिती सेनाभवनात सादर करायची आहे. त्यामध्ये विविध कार्यक्रम, आढावा बैठका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील चार महिन्यांमध्ये १५ दिवसातून दोन दिवस विधानसभा क्षेत्रात संपर्क प्रमुखांनी स्वतः उपस्थितीत राहून आढावा घेण्याचे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी आपल्या संपर्क प्रमुखांना केले आहे.