‘अब की बार २०० पार’…विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीचा नवा नारा !

जळगाव टुडे । ‘अब की बार ४०० पार’ असा नारा देऊन लोकसभेच्या निवडणुकीला सामोऱ्या गेलेल्या महायुतीला राज्यात खूप मोठ्या पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्यानंतरही विधानसभेच्या आगामी निवडणुकीत ‘अब की बार २०० पार’ नारा देण्याची हुकी महायुतीच्या नेत्यांना आली आहे. विशेषतः भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासंदर्भात केलेले जाहीर वक्तव्य जास्त चर्चेचा विषय ठरले आहे. ( Vidhansabha Election )

Vidhansabha Election
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय बैठक मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शनिवारी सायंकाळी पार पडली. त्यात मार्गदर्शन करताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस बोलत होते. आपण महायुतीत २०० पेक्षा जास्त आमदार आहोत आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत. त्यामुळे आपण विधानसभेच्या आगामी निवडणुकीत २०० पेक्षा जास्त जागा सहजपणे जिंकू शकतो, असा दावा त्याठिकाणी श्री.फडणवीस यांनी केला.

महायुतीचे काही प्रवक्ते व नेते सध्या बरीच वादग्रस्त वक्तव्ये करताना दिसून आले आहेत. त्यातून महायुतीत विसंवाद असल्याचे चित्र निर्माण होत आहे. त्यामुळे सर्वांनी कोणतीही वक्तव्ये जपून करावी, असाही सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना व प्रवक्त्यांना बैठकीत दिला. महायुतीतील प्रवक्ते, पदाधिकारी व नेते यांनी एकमेकांच्या विरोधात बोलायची खुमखुमी आली असेल तर त्यांनी त्यांच्या नेत्यांकडे जाऊन आधी परवानगी घ्यावी. आपल्या नेत्याला जाऊन विचारावे की मला बोलायची खुमखुमी आली आहे, तर मी बोलू का? तुमच्या नेत्यांनी परवानगी दिली तर खुशाल बोला आणि तुमची खुमखुमी दूर करून घ्या. परंतु, आपण सर्वजण एक आहोत आणि एकच राहिले पाहिजे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ( Vidhansabha Election )

आपण एकत्र नसल्याचा अपप्रचार विरोधक करू लागले आहेत. आपण जेव्हा एकमेकांविरोधात वक्तव्ये करतो तेव्हा दुर्दैवाने विरोधकांच्या अपप्रचाराला जास्त चालना देतो. अशाने आपलीच विकेट पडते. महायुतीचे वरिष्ठ नेते तिकीट वाटप करतील. कोणाला कुठली जागा मिळणार? हे वरिष्ठ नेते ठरवतील. मी स्वतः तसेच अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीमधील वरिष्ठ नेते एकत्र बसून त्यावर चर्चा करू, असेही फडणवीस बैठकीत म्हणाले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button