जळगाव जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी शुक्रवारी गारपिटीसह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी
Unseasonal Rain : हवामान विभागाने खानदेशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात शुक्रवारी (ता.12) हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात बऱ्याच ठिकाणी गारपिटीसह जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे उशिरा पेरणी झालेल्या गव्हाचे तसेच उन्हाळी हंगामातील बाजरी, मका आदी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. काही ठिकाणी वादळामुळे घरांवरील पत्रे देखील उडाली आहेत.
राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाळी वातावरणाची निर्मिती झाली असून, बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीने तडाका दिला आहे. त्याचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसला असून, रब्बी व उन्हाळी पिकांची अतोनात हानी त्यामुळे झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, हवामान विभागाने शुक्रवारी देखील विदर्भातील गडचिरोली, यवतमाळ व चंद्रपूर तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर, नांदेड, धाराशिव जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता. त्याचप्रमाणे खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलडाणा, नागपूर, वर्धा, वाशीम जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तविली होती.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी दुपारनंतर पाचोरा, भडगाव, जळगावसह अन्य तालुक्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लागली. अमळनेर तालुक्यात तब्बल पंधरा मिनिटे बोरांच्या आकाराची गारपीट झाली. त्यामुळे शेतांमधील पिकांचे मोठे नुकसान झाले. अचानक कोसळलेल्या पावसामुळे तापमानात कमालीची घट होऊन वातावरणात गारवा निर्माण झाल्याचा प्रत्यय देखील आला.