जामनेर तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले…केळीबागांसह मका, ज्वारी, गहू पिकाचे नुकसान

मंत्री गिरीश महाजन यांनी नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

Unseasonal Rain : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यास मंगळवारी (ता.09) दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने चांगलेच झोडपले. या अवकाळी पावसामुळे केळीच्या बाग तसेच मका, ज्वारी, गहू आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी वादळी पावसाचा तडाका बसलेल्या भागाला तातडीने भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला.

जामनेर तालुक्यातील खडकी-बोरगाव, महुखेडा, लोणी, आमखेडा, सावरला, तळेगाव, गारखेडा आदी गावांना मंगळवारी अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. जामनेर शहरातही दहा ते पंधरा मिनीटे दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. वादळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मिळताच राज्याचे ग्रामविकास तथा पर्यटन मंत्री गिरीश महाजन हे तातडीने खडकी-बोरगाव परिसर तसेच तळेगाव-आमखेडा, गारखेडा परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी रवाना झाले. यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळेंसह अधिकारी वर्ग उपस्थित होता. या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पुर्ण करण्याचे आदेश मंत्री महाजनांनी अधिकाऱ्यांना दिले. पिकांच्या नुकसानीची राज्य शासनाने दखल घेतली असून, नुकसानग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत लवकरात लवकर देण्यात येईल, असेही आश्वासन मंत्री महाजन यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button