जळगाव जिल्ह्यास अवकाळी पावसाचा तडाका, रब्बी पिकांचे अतोनात नुकसान
तातडीने पंचनामे करण्याची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी
Unseasonal Rain : हवामान विभागाने विदर्भासह मराठावाड्याला गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा दिलेला होता. प्रत्यक्षात खान्देशातील जळगाव जिल्ह्यास सोमवारी (ता. 26) रात्री अवकाळी पावसाचा तडाका दिला. वादळासह गारपिटीने जळगाव, एरंडोल, धरणगाव, चोपडा, अमळनेर, पारोळा, चाळीसगाव तसेच रावेर आदी तालुक्यात गव्हासह ज्वारी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, जळगाव जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता तशी कमीच होती. मात्र, सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरणाची निर्मिती झाल्याने गहू तसेच ज्वारीसारख्या रब्बी पिकांची काढणी करण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. बऱ्याच शेतकऱ्यांची ज्वारी शेतात कापून पडली होती तर काहींनी ज्वारीची कापणी करण्याच्या उद्देशाने आवश्यक ती जय्यत तयारी करून ठेवली होती. दिवसभर कायम राहिलेल्या ढगाळ वातावरणातच अनेक शेतकऱ्यांनी घाईगर्दीत शक्य तेवढी कामे उरकली. मात्र, सायंकाळनंतर वातावरणाचा रंग अचानकपणे बदलला आणि जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्यास सुरूवात झाली. रात्री उशिरापर्यंत पावसाला आणखी जोर चढला. शेतात उभी असलेली पिके जमिनदोस्त झाली. कापणी होऊन पडलेली पिके पाण्यात भिजली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हृदयाचे ठोकेच वाढले. खरिपात कापसाने निराशा केल्यानंतर रब्बी पिकांकडून चांगल्या उत्पादनाची आशा बाळगून असलेल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सोमवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व वादळाने मोठे नुकसान झाले आहे. सदरच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी संबंधित सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आता केली आहे.