खासदार उन्मेश पाटील यांच्यासोबत नेमके कोणते पदाधिकारी शिवबंधन बांधणार ?
जळगाव जिल्ह्यात सगळीकडे उलटसुलट चर्चांना ऊत
Unmesh Patil | जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज असलेले भाजपाचे खासदार उन्मेश पाटील हे बुधवारी (ता.03) दुपारी उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खुद्द त्यास दुजोरा दिला आहे. दरम्यान, खासदार पाटील यांच्यासोबत नेमके कोणकोणते पदाधिकारी शिवबंधन बांधणार आहेत, त्याबद्दल जन सामान्यांच्या मनात मोठे कुतुहल निर्माण झाले आहे. सगळीकडे उलटसुलट चर्चांना ऊत सुद्धा आला आहे.
भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघात स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्याने विद्यमान खासदार उन्मेश पाटील हे गेल्या काही दिवसांपासून खूपच नाराज होते. तशी त्यांनी थेट नाराजी जाहीरपणे व्यक्त केलेली नसली तरी पक्षाचे मेळावे आणि कार्यक्रमांपासून ते लांबच होते. दरम्यान, खासदार पाटील हे पत्नी संपदा पाटील यांच्या उमेदवारीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती. मात्र, आज मंगळवारी थेट शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन पाटील यांनी सगळ्यांना मोठा धक्का दिला. दरम्यान, पत्रकारांनी त्यांना त्याबाबत विचारणा केल्यावर केवळ मैत्रीचे नाते जपण्यासाठी आपण खासदार राऊतांची भेट घेतल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. शिवबंधन बांधणार की नाही, त्याचा संस्पेन्स त्यांनी कायम ठेवला. परंतु, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खासदार पाटील यांच्या पक्ष प्रवेशाची तारीख आणि वेळ सांगून त्यांचे सगळेच पत्ते एक दिवस आधी खुले करून टाकले.
पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदेंच्या निवेदनाने मोठा संभ्रम दूर झाला
दुपारपर्यंत खासदार पाटील यांच्यासोबत पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार आणि भाजपचे पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. त्यासंदर्भातील बातम्या समाज माध्यमांवर देखील प्रसिद्ध झाल्या. परंतु, घडला प्रकार लक्षात आल्यानंतर अमोल शिंदे यांनी स्वतः आपण भाजप सोडून कुठेच जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या निवेदनाने मोठा संभ्रम त्यामुळे दूर झाला. परिणामी, खासदार उन्मेश पाटील आता सपत्निक आणि त्यांच्यासोबत करण पवार हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.