संजय राऊत यांना भेटल्यावर भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांच्याकडून मोठा खुलासा

Unmesh Patil | भाजपाने जळगावमध्ये विद्यमान खासदाराला उमेदवारी नाकारून गेल्या वेळी तिकीट कापलेल्या स्मिता वाघ यांना उमेदवारी देऊन मोठे धक्कातंत्र यावेळी अवलंबले आहे. अशा या परिस्थितीत गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले खासदार उन्मेश पाटील हे आज मंगळवारी (ता.02) शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईत गेले होते. दोघांची भेट झाल्यानंतर खासदार श्री.पाटील यांनी मोठा खुलासा देखील केला आहे.

भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघात स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्याने विद्यमान खासदार उन्मेश पाटील हे नाराज असून, पत्नी संपदा पाटील यांच्या उमेदवारीसाठी ते शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा देखील होती. प्रत्यक्षात त्यासंदर्भात कोणतीच थेट प्रतिक्रिया खासदार पाटील यांनी दिली नव्हती. मात्र, आज मंगळवारी थेट शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन खासदार उन्मेश पाटील यांनी सगळ्यांना मोठा धक्का दिला. दरम्यान, पत्रकारांनी त्यांना त्याबाबत विचारणा केल्यावर “केवळ मैत्री जपण्यासाठी आपण खासदार राऊतांची भेट घेतल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. राऊत यांच्याशी मन की नव्हे तर मैत्रीची बात करण्यासाठी आपण गेलो होतो,” असा खुलासा देखील खासदार पाटील यांनी केला. याप्रसंगी त्यांच्यासोबत पारोळ्याचे करण पवार देखील उपस्थित होते.

मला अजूनही वाटत नाही उन्मेशदादा असा काही निर्णय घेतील : स्मिता वाघ

दरम्यान, भाजपचे खासदार उन्मेश पाटील हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या वृत्तावर भाजप उमेदवार स्मिता वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, की “संजय राऊत हे खासदार उन्मेश पाटील यांचे मित्र असल्यामुळे त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी उन्मेश पाटील हे गेले आहेत. त्यामुळे मला अजूनही असे वाटत नाही की उन्मेशदाद हे असा काही निर्णय घेतील. मी आज प्रचारांमध्ये असल्याने कुठलीच बातमी बघितलेली नाही. मात्र माझा अजूनही ठाम विश्वास आहे की अशा कुठल्याही घडामोडी घडणार नाहीत. उन्मेशदादा भाजपमध्येच राहतील.”

WhatsApp Group

Related Articles

Back to top button