केळी पिकविमा नुकसान भरपाईचे 53 कोटी रूपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात
खासदार उन्मेश पाटील यांची माहिती
Unmesh Patil : जळगाव जिल्ह्यातील केळी पिकविमा नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेल्या 9,600 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर सुमारे 53 कोटी रूपयांची रक्कम जमा होण्यास सुरूवात झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच पिकविमा नुकसान भरपाईची रक्कम मिळेल, अशी माहिती जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांनी दिली आहे.
ज्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी पिकविमा प्रस्तावांना मान्यता मिळून देखील नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नव्हते, अशा शेतकऱ्यांना प्रामुख्याने 53 कोटींपेक्षा जास्त रकमेतून लाभ देण्यात येत आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सर्व रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची क्षेत्र तफावत होती अशा 11,300 केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रस्ताव तसेच जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेले 6,686 (ज्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव विमा कंपनीने नामंजूर केले होते) असे सर्व प्रस्ताव कृषी आयुक्तालय स्तरावर पुढील कारवाईसाठी सादर करण्यात आले आहेत, अशीही माहिती खासदार श्री.पाटील यांनी दिली आहे.
प्रलंबित प्रस्तावांना मान्यता मिळवून देण्यासाठीही पाठपुरावा करणार
दरम्यान, प्रलंबित असलेले सुमारे 11,300 (किती वाजता क्षेत्रामधील तफावत मुळे रखडलेले) + 6,686 (जिल्हास्तरीय समितीने मंजूर करून कृषी आयुक्तालय स्तरावर पुढील कार्यासाठी पाठवलेले) प्रस्तावांचा देखील पाठपुरावा करण्यात येत आहे. लवकरच प्रलंबित प्रस्तावांना सुद्धा मान्यता मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे खासदार उन्मेश पाटील यांनी म्हटले आहे.