एरंडोलला दिव्यांग बांधवांना खासदार उन्मेश पाटील यांचे हस्ते बॅटरीवरील तीन चाकी सायकलींचे वाटप…!
Unmesh Patil : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (एडीआयपी) योजनेअंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिंम्को) कानपूर यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारच्या वतीने एरंडोल तालुक्यातील पूर्व तपासणी व नोंदणी झालेल्या 212 दिव्यांग बांधवांना बॅटरीवरील तीन चाकी सायकल वाटप खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
तेली समाज मंगल कार्यालयात दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर एरंडोलचे माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी, भाजपा तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा चिटणीस निलेश परदेशी, शहराध्यक्ष नगरसेवक नितीन महाजन, पारोळा नगरपरिषदेच्या माजी सभापती अंजली करनदादा पाटील, जिल्हा अपंग पुनर्वसन अधिकारी गणेश कर, सचिनभाऊ विसपुते, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस पिंटू राजपूत, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्र्वर कखरे, आरोग्य दूत शामभाऊ ठाकूर, यश महाजन, भगवान मराठे, ऍड. मधुकर देशमुख, आनंद सूर्यवंशी, अमर राजपूत, विवेक ठाकूर, मयूर ठाकूर,रविभाऊ चौधरी, उद्योजक जितेंद्र चौधरी उत्राणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
एलिंम्को मुंबईचे डॉ. किरण पावरा यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की खासदार उन्मेश पाटील यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या पूर्व तपासणी शिबिरात ज्या दिव्यांग बांधवांची नोंदणी केली होती. त्याच 212 दिव्यांग बांधवांना आज बॅटरीवरील तीन चाकी सायकल, कर्णयंत्र, अंध बांधवांना स्मार्ट फोन, सेन्सर काठी, व्हील चेअर, कुबडी, काठी आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.
दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान
यावेळी दिव्यांग बांधव अनिल रमेश विसपुते म्हणाले की, गेल्या वर्षभरापूर्वी पूर्व तपासणी शिबीर झाले होते. त्यामुळे साहित्य कधी भेटेल ही उत्सुकता होती. वेळोवेळी खासदार उन्मेश पाटील यांना मी फोन करून विचारत होतो. त्यांनी विश्वास दिला होता की, तुमची तपासणी झाली असेल तर तुम्हाला साहित्य लवकरच मिळेल. आज हे साहित्य मिळाल्याने मी खासदार पाटील यांचे आभार व्यक्त करतो. यावेळी विविध साहित्य घेताना दिव्यांग बंधू, भगिनी, त्यांच्या पालकावरच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते. भाजप शहराध्यक्ष नितीन महाजन यांनी आभार मानले.