‘तीन मंत्र्यांचा तिघाडा अन् काम बिघाडा…’ म्हणून थांबला जळगाव जिल्ह्याचा विकास !
माजी खासदार उन्मेश पाटील यांचा आरोप
जळगाव टुडे । खान्देशातील जळगाव जिल्ह्यात सध्या तीन कॅबिनेट मंत्री असून, महत्वाची खाती असताना त्यांनी ठरविले असते तर जिल्ह्याचा मोठा कायापलट आतापर्यंत होऊ शकला असता. मात्र, तिन्ही मंत्र्यांच्या निष्क्रियतेमुळे जळगाव जिल्ह्यात विकासाचा कोणताही ठावठिकाणा दिसून आलेला नाही. गेल्या काही वर्षात या जिल्ह्यात कोणताही मोठा प्रकल्प आलेला नसून, तिन्ही मंत्र्यांच्या तिघाड्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचा विकास थांबल्याचा आरोप माजी खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांनी येथे आज केला.
सत्ताधारी पक्ष व त्यांच्या मंत्र्यांच्या अनास्थेमुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, पशुपालकांचे सध्या कसे हाल सुरू आहेत, यासंदर्भात माहिती देऊन त्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना ठाकरे गटातर्फे जळगावमध्ये सोमवारी (ता.27) दुपारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बोलताना माजी खासदार उन्मेश पाटील यांनी राज्यातील महायुतीचे सरकार आणि त्यांचे जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. याप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर जयश्रीताई महाजन, उपजिल्हा प्रमुख महेंद्र पाटील,महानगर प्रमूख शरद तायडे, उपजिल्हा प्रमुख भाऊसाहेब सोनवणे, युवा सेनेचे विराज कावडिया,धरणगाव तालुका प्रमुख जयदीप पाटील,विजय लाड, सुनिल ठाकूर, राकेश घुगे, प्रीतम शिंदे, सचिन चौधरी, राजेश वारके, हर्षल मुंडे, कृष्णा ठाकूर, शुभम लाड, जळगाव बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
खान्देशला समृद्धी महामार्गाशी का जोडले नाही ?
“मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाला विदर्भातील भंडारा-गडचिरोली तसेच मराठवाड्यातील नांदेड आणि इतरही काही जिल्हे जोडण्यात आले आहेत. मग समृद्धी महामार्गाशी खान्देशातील जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्हे का जोडले गेले नाही? समृद्धी महामार्गाशी खान्देशला जोडण्यासाठी स्वतंत्र डीपीआर का तयार झाला नाही? एकावेळी तीन मंत्री असलेल्या जळगाव जिल्ह्यास तसेच लगतच्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यास का उपेक्षित ठेवले गेले? संपूर्ण महाराष्ट्र समृद्धी महामार्गाशी जोडला जात असताना खान्देशने कोणाचे घोडे मारले होते? हे तिन्ही मंत्र्यांचे अपयश नाही का?,” असे काही प्रश्न देखील माजी खासदार पाटील यांनी जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केले.