“बदला म्हणून नाही तर बदल म्हणून मी आता पुढचे राजकारण करत आहे”- उन्मेश पाटील

-शिवबंधन हाती बांधून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

Unmesh Patil | बदला म्हणून नाही तर बदल म्हणून मी आता पुढील राजकारण करत आहे, असे वक्तव्य करून आपण कोणतीही अट न ठेवता शिवसेनेत प्रवेश केल्याचे उन्मेश पाटील यांनी आज मुंबईत शिवसेना ठाकरे गटाच्या पक्ष प्रवेशावेळी बोलून दाखवले. लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आज बुधवारी (ता.03) उन्मेश पाटील यांनी हाती शिवबंधन बांधून शिवसेना ठाकरे गटात रितसर प्रवेश केला.

भाजपकडून जळगावची उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज असलेले उन्मेश पाटील हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याने बुधवारी जळगाव जिल्ह्यातील त्यांचे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले होते. त्यात पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांचाही समावेश होता. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश मातोश्रीवर पार पडला. याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी उन्मेष पाटील यांना उद्देशून बोलताना म्हटले की, “तुमच्या आणि माझ्या व्यथा सारख्याच आहेत. काम झाले की फेकून द्यायचे ही भाजपाची वृत्ती आहे. तुम्ही प्रवाहाच्या विरोधात उडी मारली आहे. हा प्रवाह जनमताचा आहे. प्रवाह एकदा फिरला की, मोठे ओंडकेही वाहून जातात. तशीच भाजपाची अवस्था होणार आहे. आज माझ्याकडे काही नाही, जे तिथे गेलेत त्यांची ओळख खोकेवाले अशी झाली आहे. अशा वेळी तुम्ही काम करण्यासाठी, बदल करण्यासाठी येथे आला आहात. सत्ता असते तिथे लोक जातात. पण जनतेची सत्ता आणण्यासाठी तुम्ही शिवसेनेसोबत आलात.”

“निष्ठावंतांच्या नशिबी नेहमीच संघर्ष असतो. शिवसेनेत कदर असल्याने उन्मेश पाटील आमच्यासोबत आले आहेत. त्यांच्या येण्याने उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेला बळ मिळेल. संघर्षाच्या काळात त्यांच्यासारखा नेता उद्धव ठाकरे यांच्या सोबत उभा राहिल्याबद्दल अभिनंदन करतो,” असे खासदार संजय राऊत यांनी नमूद केले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button