ॲड.उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकीलपदी फेरनियुक्तीला भाजप मधुनही विरोध !

जळगाव । लोकसभेच्या उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राहिलेले राज्याचे माजी विशेष सरकारी वकील ॲड.उज्ज्वल निकम ( Ujjwal Nikam ) यांचा पराभव काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी केला होता. दरम्यान, लोकसभेचा निकाल लागून 15 दिवस उलटत नाही तेवढ्यातच ॲड.निकम यांची विशेष सरकारी वकीलपदी फेरनियुक्ती करून राज्य शासनाने सर्वांना मोठा धक्का दिला आहे. त्याबद्दल खुद्द भाजपमधून आता नाराजीचा सूर उमटू लागला आहे. कारण, लोकसभेत भाजपच्या तिकीटावर उभे राहून पराभूत झालेल्या अनेकांचे अद्याप कोणतेच पुनर्वसन झालेले नाही.

शासनाने ॲड.निकम यांची विशेष सरकारी वकीलपदी फेरनियुक्ती केल्यानंतर काँग्रेस पक्षाने देखील त्याविषयी जोरदार आक्षेप घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटल्यानुसार, भाजपने न्याय व्यवस्थेत आपली माणसे घुसवून मोठे पाप केले आहे. उज्ज्वल निकम यांनी नुकतीच लोकसभेची निवडणूक लढवली आहे आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची सरकारी वकील पदावर नियुक्ती करून भाजप राज्यात चुकीचा पायंडा पाडत आहे. त्यांच्या सरकारी वकीलपदी झालेल्या नियुक्तीला काँग्रेसचा विरोध असून, शासनाने त्याचा फेरविचार करावा, असेही श्री.पटोले यांनी म्हटले आहे.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याचे मूळ रहिवाशी असलेले ॲड.निकम यांना भारतीय जनता पार्टीने लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर-मध्य मुंबईसाठी उमेदवारी दिली होती. प्रत्यक्षात काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी निकम यांचा 16 हजार 514 मतांनी पराभव केला. त्यानंतर लगेचच निकम यांचे सरकारी वकील पद देऊन पुनर्वसन करण्याची घाई भाजपने केली. त्यामुळेच शासनावर टीकेची झोड उठली आहे. खुद्द भाजपच्या गोटातून नाराजीचा सूर निघत असून, पक्षाच्या निष्ठावानांचा विचार सोडून बाहेरून आयात केलेल्या निकमांना पराभूत झाल्यानंतर मानाचे पद दिल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली जात असल्याची माहिती मिळाली आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button