तर उज्ज्वल निकम पाच वर्षांपूर्वीच राहिले असते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार ! : Ujjwal Nikam
Jalgaon Today : लोकसभेच्या उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना उमेदवारी देऊन भारतीय जनता पार्टीने विरोधी पक्षांना चांगलेच कोंडीत पकडल्याचे बोलले जात आहे. पण तुम्हाला माहिती आहे का आताची ही संधी कदाचित भाजपला मिळालीच नसती, जर पाच वर्षांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेली ऑफर ॲड. निकम यांनी स्वीकारली असती. स्वतः निकम यांनी त्याबद्दल मोठा खुलासा एका मुलाखतीत केला आहे.
तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार आणि ॲड.उज्ज्वल निकम यांचे तसे पूर्वापार कौटुंबिक संबंध राहिले आहेत. त्याच अधिकारातून पवारांनी निकमांकडे राष्ट्रवादीच्या प्रवेशाविषयीचा प्रस्ताव बऱ्याचवेळा सादर पण केला होता. पण पवारांना त्यात कधीच यश मिळाले नव्हते आणि हात चोळत बसावे लागले होते. काही केल्या निकम हाती लागत नसल्याने नंतर शरद पवारांनी स्वतः त्यांचा पिच्छा पुरविणे सोडून दिले होते. तशात आताच्या 2024 च्या निवडणुकीत अचानक भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी स्वीकारून ॲड.उज्ज्वल निकम यांनी शरद पवारांसह सर्वांनाच आश्चर्याचा जोरदार धक्का दिला आहे.
दरम्यान, “पाच वर्षांपूर्वी मला राजकारणात येण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ऑफर दिली होती. त्याबाबत शरद पवार साहेबांनी मला विचारणा करून जवळपास चाळीस मिनिटे माझ्याशी चर्चा केली होती. तुम्ही राजकारणात उभे राहा, वयाचा विचार करता तुम्ही दहा वर्ष राजकारणात पाहिजे. पवार साहेंबाचा हेतू प्रामाणिक होता. पण मी म्हणालो, विचार करु सांगतो,” असा खुलासा उज्ज्वल निकम यांनी आता केला आहे. याशिवाय राजकीय पक्षांच्या पलीकडे माझे सर्वांशी चांगले आणि सलोख्याचे संबंध आहेत. कुणाशी व्यक्तिगत शत्रुत्व असण्याचे कारण नाही. मी कधीही कोणत्याही राजकीय नेत्याला याची बदली करा त्याची बदली करा, असे सांगितले नसल्याचे ॲड.निकम यांनी म्हटले आहे.