“माझ्या लोकसभा उमेदवारीने अनेकांना ४२० व्होल्टचा शॉक लागलेला असू शकतो”
ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केली भूमिका
Jalgaon Today : “भारतीय जनता पक्षातर्फे उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघासाठी माझ्या नावाचा विचार करण्यात आला. याबाबत सर्वप्रथम मी भाजपा नेतृत्वाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. माझ्या उमेदवारीच्या वृत्ताने अनेकांच्या भुवया उंचावलेल्या असणे स्वाभाविक आहे. अनेकांना ४२० व्होल्टचा शॉक देखील लागलेला असू शकतो. पण त्या पलीकडे जात मी ही उमेदवारी का स्वीकारली..? सक्रिय राजकारणामध्ये येण्याबाबत अनेकदा अनेक पक्षांकडून, ज्येष्ठ नेत्यांकडून विचारणा होऊनही मी आजवर नकार देत आलेलो असताना माझा निर्णय का बदलला..? भारतीय जनता पक्षाचा प्रस्तावच मी का स्वीकारला? या जनतेच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देणे मला आवश्यक वाटते”, असे ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी म्हटले आहे.
“मुळात राजकारण हा माझा प्रांत नाही, या मतावर मी आजही ठाम आहे. कारण आयुष्याची आजपर्यंतची सर्व कारकिर्द मी वकिली व्यवसायामध्ये व्यतीत केली आहेत. त्यामुळे राजकारण हा माझा पिंड नाही. तरीही मला राजकारणात येण्याबाबत अनेकदा विचारणा करण्यात आली होती, हेही वास्तव आहे. राज्यातील ज्येष्ठ नेत्यांकडून गेल्या निवडणुकीच्या वेळी मला उमेदवारीसाठी खूप आग्रह करण्यात आला होता; पण मी तेव्हा नम्रपणाने नकार दिला. माझ्या आजच्या निर्णयामुळे सर्वांत पहिला धक्का त्यांना बसला असेल यात शंका नाही. आता प्रश्न उरतो तो भारतीय जनता पक्षच का? त्यामागे काही कारणे आहेत. वकिली क्षेत्रातील कारकिर्दीमध्ये १९९३ चा मुंबई बॉम्बस्फोट खटला हा माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा किंवा टर्निंग पॉईंट ठरला. या खटल्यानंतर मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट असोत किंवा २६/११ चा भीषण दहशतवादी हल्ला असो विविध केसेस मी लढवल्या आणि न्यायप्रक्रियेतील सर्व आयुधे वापरुन या खटल्यातील संबंधित गुन्हेगारांना कठोरातील कठोर शासन होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. अजमल कसाबसारख्या भारताच्या सार्वभौमत्वावर घाला घालण्याच्या इराद्याने आलेल्या दहशतवाद्याला फासापर्यंत पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झालो, याचा मला सार्थ अभिमान आहे. पण हे खटले लढत असताना मला तत्कालीन राजकीय व्यवस्थेतील उणिवा, कमकुवतपणा स्पष्टपणाने जाणवत होता. याउलट गेल्या दहा वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राष्ट्रहित सर्वोच्च स्थानी ठेवत दहशतवादाविरोधात जी कठोर पावले उचलली त्यामुळे मी प्रभावित झालो. टेरर अँड टॉक एकाच वेळी होणार नाही, ही कणखर भूमिका घेतानाच देशातील लष्कराला मुक्त हस्त देत त्यांच्या सक्षमीकरणातून काश्मीर खोर्यासह देशातील राष्ट्रविरोधी तत्वांचा बिमोड करण्यामध्ये या सरकारने मिळवलेले यश हे अनन्यसाधारण आहे”, असेही उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) बोलले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज देश सुखरूप, शांततेचे जीवन जगत आहे
“दहा वर्षांमध्ये देशात एकही बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी हल्ला न होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. दहा वर्षांपूर्वीचा काळ आठवून पहा, पुणे, मुंबई यांसारख्या देशातील महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ले करुन पाकिस्तानने भारतीयांच्या मनावर एक भीतीचे सावट निर्माण केले होते. देशातील स्लीपर सेल्सची संख्या वाढत चालली होती. पण तत्कालीन राजकीय व्यवस्था पाकिस्तानविरोधात ठोस भूमिका घेण्याऐवजी फुटिरतावाद्यांसमोर गुडघे टेकताना दिसत होती. याउलट मोदी सरकारने पुलवामा असेल, उरी असेल या ठिकाणी झालेल्या हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक करुन पाकिस्तानला जरब बसवला. जागतिक पटलावर पाकिस्तानची कोंडी केली. राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आज भारताच्या आर्थिक विकासाचे गोडवे जगभरात गायले जात आहेत आणि पाकिस्तान भिकेकंगाल झाला आहे.
केवळ पाकिस्तानचे कंबरडे मोडून हे सरकार थांबले नाही; तर आज भारताचे इस्लामिक देशांसोबतचे संबंधही कमालीचे सुधारले आहेत. त्यामुळेच कतारसारख्या देशातील न्यायालयाने भारताच्या ८ माजी नौदल अधिकार्यांना फाशीची शिक्षा सुनावूनही राजनयाचा सुरेख वापर करत तेथील राजाच्या अधिकारांतर्गत या आठही जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. कलम ३७० आणि ३५ अ रद्द करुन काश्मीरच्या नंदनवनात विकासाची गंगा नेण्याचे काम या सरकारने केले. पंजाबमधील खलिस्तान्यांचा उद्रेक असो, चीनचे आव्हान असो किंवा पाकिस्तानला दिलेला शह असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज देश सुखरूप, शांततेचे जीवन जगत आहे. येणार्या काळात ‘विकसित भारता’चे उद्दिष्ट ठेवून भारताची वाटचाल सुरू झाली आहे. या विकासाच्या यात्रेमध्ये प्रत्येकाने आपापले योगदान द्यायचे आहे. त्या उद्देशाने मी ही उमेदवारी स्वीकारली आहे”, असे त्यांनी स्पष्ट केले.
माझ्यासाठी संविधानासह कायदा आणि राष्ट्र हेच नेहमी सर्वश्रेष्ठ राहिले
“माझ्या उमेदवारीबाबत ‘बाहेरचा उमेदवार’ अशी टीका विरोधकांकडून होऊ शकते. पण जळगाव ही माझी जन्मभूमी असली तरी मुंबापुरी ही माझी कर्मभूमी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी ज्या दहशतवादी हल्ल्यांविरोधातील खटले लढलो त्यातील व्हिक्टिम किंवा बळी हे याच मुंबापुरीतील होते. त्यांच्या न्यायासाठीचा माझा संघर्ष होता. तिसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रहितासाठी काम करण्याचा संकल्प करणार्या व्यक्तीला भौगोलिक सीमांचे बंधन कधीच नसते. त्यामुळे ‘बाहेरचा उमेदवार’ अशी टीका करणे याचा अर्थ प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माझ्या उमेदवारीमुळे धसका घेतला आहे असा होतो. आणखी एक मुद्दा म्हणजे, काही जणांनी माझ्या उमेदवारीची चर्चा सुरू झाल्यापासून माझी प्रतिमा मुस्लिमविरोधी अशी बनवण्याचा खटाटोप चालवला आहे. पण तो पूर्णतः चुकीचा आहे. ४०-५० वर्षांच्या वकिलीच्या कारकिर्दीमध्ये मी कधीच जातपात-धर्म यांचा विचार केला नाही. माझ्यासाठी संविधान, कायदा आणि राष्ट्र हेच सर्वश्रेष्ठ राहिले. या तिन्हींवर घाला घालण्याचे, राष्ट्रीय सुरक्षेला आव्हान देण्याचे प्रयत्न ज्यांनी केले त्यांचा धर्म पाहण्याची गरज मला कधीच वाटली नाही. कारण कायद्यापुढे सर्व समान असतात, हे कायद्याचे सर्वांत महत्त्वाचे तत्व आहे आणि मी या तत्व प्रणालीचा पाईक म्हणून कार्यरत राहिलो आहे”, असेही उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी म्हटले आहे.