व्हिडीओ व्हायरल…शरद पवारांसमोर उद्धव ठाकरेंची खरंच काही किंमत नाही ?
Jalgaon Today : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बहुतांश पक्षांचे नेते आणि पदाधिकारी सध्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. काही जणांनी मागचे जुने व्हिडीओ व्हायरल करून समोरच्या पक्षांची तसेच त्यांच्या नेत्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न देखील केला आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, त्यामाध्यमातून शरद पवारांसमोर उद्धव ठाकरे यांना काहीच किंमत नसल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. (Uddhav thackeray)
विशेष म्हणजे सदरचा व्हिडीओ भाजपने शेअर केला असून, त्यामाध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधल्याचे दिसून आले आहे. भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी तो व्हिडीओ एक्स म्हणजे ट्वीटरवर व्हायरल केल्यानंतर त्याचे पडसाद व्हाटस्ऍप आणि फेसबुकवर देखील उमटले. त्या व्हिडीओमध्ये शरद पवार एका बैठकीच्या निमित्ताने खुर्चीवर बसलेले दिसत असून, बाजुला उद्धव ठाकरेंसह काही पदाधिकारी उभे आहेत. दरम्यान, काही क्षणानंतर शरद पवार हे उद्धव ठाकरेंना बाहेर जाण्याची सूचना करतात, तर उद्धव ठाकरे त्यांच्या सूचनेचे पालन करून मी बाजुला आहे आणि जरा फ्रेश होऊन येतो, असे सांगतात.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाषणाचा तो व्हिडीओ व्हायरल करून भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरेंची शरद पवार यांच्यासमोर काहीच किंमत नसल्याचे भासविण्याचा पुरेपुर प्रयत्न केला आहे. तसा भास व्हिडीओ पाहणाऱ्यांच्या मनात निर्माण करण्यात त्यांना यश देखील आले आहे. सदरच्या व्हायरल व्हिडीओमुळे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बरीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओची सत्यता जाणून घेण्याचा कोणताच मार्ग सध्या दिसून आलेला नाही. कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया त्यासंदर्भात अद्याप देण्यात आलेली नाही.