कार अपघातात वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या दोन मुली व जावयाचा मृत्यू !
जळगाव टुडे । वडिलांचे निधन झाल्यानंतर दोन्ही मुली व जावई कारने अंत्यसंस्कारासाठी मुंबईहून निघाले होते. दुर्दैवाने त्यांच्या भरधाव कारने कंटेनरला धडक दिल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक तरूणी गंभीर जखमी झाली आहे. ही धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील वाके फाट्याजवळ आज गुरुवारी सकाळी घडल्याचे उघडकीस आले आहे. ( Accident News )
Accident News
मीनाक्षी अरुण हिरे (वय ५३, रा. टिटवाळा, ठाणे), अनिशा विकास सावंत (वय ४०) आणि विकास चिंतामण सावंत (वय ४५, ठाकुर्ली, जि. ठाणे) अशी या कार अपघातातील मृतांची नावे आहेत. याशिवाय वैभवी प्रवीण जाधव (वय १७ रा.नाशिक) ही तरुणी अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. वैभवीवर नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मीनाक्षी हिरे व अनिशा सावंत या दोघी सख्ख्या बहिणी होत्या. त्यांच्या वडिलांचे मुंबईत निधन झाले होते आणि अंत्यविधीसाठी वडिलांचा मृतदेह एका शववाहिकेतून निमगाव येथे दोघी बहिणी घेऊन जात होत्या. शववाहिकेबरोबर जावई विकास सावंत हे स्वत:च्या कारने येत होते. या कारमध्ये त्यांची पत्नी अनिशा, मेहुणी मीनाक्षी व नाशिक येथील दुसऱ्या मेहुणीची मुलगी वैभवी असे चौघे प्रवास करत होते. गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास त्यांची कार मालेगाव तालुक्यातील वाके फाट्यालगत एका कंटेनरला धडकली. त्यात विकास, अनिशा व मीनाक्षीचा जागीच मृत्यू झाला, तर वैभवी गंभीर जखमी झाली.