Swapnil Kusale : ऑलिंपिकमध्ये चमकलेल्या स्वप्नील कुसाळेला एक कोटींचे बक्षीस व रेल्वेच्या नोकरीत बढती !
Swapnil Kusale : कोल्हापुरच्या रांगडा गडी स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत नेमबाजीत कांस्य पदक मिळवून देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नील कुसाळे याला सुमारे एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. याशिवाय गौरवाची बाब म्हणजे मध्य रेल्वे प्रशासनाने स्वप्निलला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हेडक्वॉर्टरमधील स्पोर्ट्स सेलमध्ये ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी (OSD) म्हणून बढती देण्याचे आदेश काढले आहेत.
Sport News: Swapnil Kusale, who shone in the Olympics, got a reward of one crore and promotion in the railway job!
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील आपल्या उत्तुंग यशामुळे स्वप्नीलने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यांनी मंत्रालयातील दालनातून दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राचे नाव उंचावल्याबद्दल स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे यांना शुभेच्छा दिल्या आणि एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. स्वप्निलच्या या अभिमानास्पद यशामुळे राज्यातील खेळाडूंसाठी प्रेरणा मिळाली आहे, असेही शिंदे यांनी म्हटले. काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनीही स्वप्निलला पाच लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
महाराष्ट्र सरकारने यापूर्वी स्वप्निलला ५० लाख रुपये देण्याचे जाहीर केले होते, पण दिलेच नाही
दरम्यान, स्वप्निल कुसाळेच्या मार्गदर्शक अक्षय अष्टपुत्रे यांनी त्याच्या यशामागील वाईट बाजू उघड केली आहे. ‘पॅरिस ऑलिम्पिकला जाण्याआधी महाराष्ट्र सरकारने स्वप्निलला ५० लाख रुपये देण्याचे जाहीर केले होते. आम्ही आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडूनही, आम्हाला एक पैसाही मिळाला नाही. सरावासाठी स्वप्निलला रोज २०० गोळ्यांची आवश्यकता असते आणि एक गोळी ५० रुपयांना मिळते. आज त्याने ब्राँझ जिंकले म्हणून कौतुक होतं आहे, पण जर सरकारी मदत वेळेवर मिळाली असती तर आज चित्र अजून वेगळे असते.” अष्टपुत्रे यांच्या या वक्तव्यामुळे स्वप्निलच्या यशामागील संघर्षाची दाहकता समोर आली आहे. सरकारी मदतीच्या अभावी त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. इतक्या मोठ्या यशासाठी लागणारा सराव आणि त्यासाठी लागणाऱ्या संसाधनांची उपलब्धता ही अत्यंत महत्त्वाची आहे. स्वप्निलच्या सरावाला लागणारे गोळ्या आणि इतर संसाधने वेळेवर मिळाली असती तर त्याच्या तयारीत अडथळे आले नसते.
स्वप्निलने आपल्या अथक परिश्रमाने आणि समर्पणाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवले असले तरी, त्याच्या मागील संघर्षाची दाहकता ही सरकारी व्यवस्थेच्या दुर्लक्षामुळे अधोरेखित होते. यामुळे भविष्यातील खेळाडूंना आवश्यक मदत वेळेवर मिळावी आणि त्यांना सरावात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी संबंधित विभागांनी अधिक सजग आणि तत्पर राहण्याची गरज आहे.