सुरेशदादांची राजकारणातून एक्झिट; संवेदनशील जळगावकरांच्या मनाला चटका लावून गेली !

जळगाव टुडे । शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि जळगावचे सलग 34 वर्षे आमदार राहिलेले सुरेशदादा जैन यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा बुधवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवून सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. सुरेशदादांनी राजकारणातून घेतलेली अनपेक्षित एक्झिट संवेदनशील जळगावकरांच्या मनाला चटका लावून गेली असून, राजकारणाच्या सध्याच्या साठमारीत त्यांच्यासारखा लोकप्रतिनिधी जळगावला पुन्हा कधीच मिळणार नाही, अशीही खंत जनसामान्यांनी व्यक्त केली आहे. (Sureshdada Jain)

कधीकाळी म्हणजे तत्कालिन जळगाव नगरपालिकेचा घरकूल घोटाळा उघडकीस येण्यापूर्वी सुरेशदादा जैन यांच्याशिवाय कोणाचे पाटले इकडचे तिकडे हलत नव्हते. सुरेशदादा जैन सांगतील तीच सर्वांसाठी पूर्व दिशा असे. जळगाव नगरपालिका सोडा हो खेडेगावातील ग्रामपंचायतीचा सरपंच व विकास सोसायटीचा चेअरमन हा सुरेशदादांना विचारल्याशिवाय पुढचे पाऊल कधी टाकत नव्हता. सुरेशदादांनी जितक्याही वेळा पक्ष बदलले तितक्या वेळा जळगावकरांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले. सुरेशदादांच्या विकासकामांचा त्यावेळी झंझावात असा होता, की आजही जळगाव शहरात जेवढी काही भव्यदिव्य विकासकामे नागरिकांना पाहायला मिळताहेत, ती सगळी दादांच्या कार्यकाळातील आहेत. जळगाव शहर महापालिकेची सतरा मजली इमारत असो की, वाघूर पाणीपुरवठा योजना की घरकूल योजना की प्रशस्त व्यापारी संकुले. सुरेशदादांच्या राजकीय कारकीर्दीला उतरती कळा लागली नव्हती तोपर्यंत त्यांना निवडणुकीत हरविणे कोणत्याच पक्षाला शक्य सुद्धा झाले नव्हते. तत्कालिन भाजप नेते एकनाथ खडसे यांनीही दादांपुढे एकवेळ हात टेकले होते.

जळगाव घरकूल घोटाळ्यातील आरोपानंतर सुरेशदादा जळगावच्या राजकारणातून अचानक बाहेर फेकले गेले. त्याचाच फायदा घेऊन नंतर भाजपसह अन्य राजकीय पक्षांनी जळगाव शहरात आपले बस्तान बसविण्याची संधी साधली. अर्थातच, जळगावची तेव्हापासून सुरू झालेली वाताहत आजतागायत कायम असून रस्त्यांपासून गटारींची आणि सार्वजनिक स्वच्छतेची सर्वत्र अक्षरशः वाट लागली आहे. सुरेशदादांच्या प्रयत्नांनी उभ्या राहिलेल्या जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या गोलाणी संकुलाची साधी लिफ्ट दुरूस्त करू न शकणाऱ्या राजकारण्यांना सुरेशदादांच्या नखाची सुद्धा बरोबरी करता आलेली नाही. सुरेशदादांचे राजकीय अस्तित्व संपविण्यासाठी जिल्ह्यातील काही मातब्बरांनी कधीकाळी जीवाचे रान केले होते. त्यांच्या त्या प्रयत्नांना यश आल्याने सुरेशदादांना कधी नाही ते जळगावमध्ये पराभवाचे तोंडही पाहावे लागले होते. किंबहुना जळगावच्या राजकारणात त्यांचा नामोनिशाणच शिल्लक राहिला नव्हता. पण नियतीने आज आता अशी वेळ आणली आहे की, सुरेशदादांना संपविण्याचा विडा उचलणाऱ्यांना दारोदारी ठोकर खात फिरावे लागत आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button