बाप से बेटी सवाई, सुप्रिया सुळे यांनी संपूर्ण महाराष्ट्र करून टाकला कन्फ्यूज !
Jalgaon Today : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राजकारणातील चाणक्य म्हटले जाते. समोरच्या व्यक्तीला कन्फ्यूज करण्याच्या बाबतीत त्यांचा हात आजपर्यंत कोणी धरलेला सुद्धा नाही. मात्र, त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे ह्या त्याबाबतीत बाप से बेटी सवाई निघाल्या आहेत…सध्याच्या घडीला कट्टर राजकीय विरोधक असलेल्या अजितदादांच्या घरी पोहोचून मंगळवारी (ता.07) त्यांनी त्याची प्रचिती संपूर्ण महाराष्ट्राला आणून दिली.
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या ठाकल्या आहेत. दरम्यान, दोन्ही बाजुंनी जोरदार ताकद लावण्यात आल्यानंतर याठिकाणच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेले आहे. वेगवान घटना व घडामोडींमुळे अनेक धक्कादायक गोष्टी तिथे रोजच ऐकायला मिळात आहेत. त्यातलीच एक आणि आजपर्यंतची सर्वात धक्कादायक मानली जाणारी गोष्ट म्हणजे मंगळवारी बारामतीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी थेट अजितदादांचे घर गाठले. आपल्या या भेटीत आपण केवळ आपल्या काकू म्हणजे अजित पवारांच्या मातोश्रींचे आशीर्वाद घेतल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, त्यांची ही भेट राजकीय दृष्टिकोनातून चांगलीच खळबळजनक ठरली आहे. प्रचारात आलेली कटुता केवळ एका भेटीने दूर होणार नाही, पण सुप्रिया सुळे यांनी मतदान सुरू असताना अजितदादांच्या घरी जाऊन मतदारांमध्ये गोंधळ मात्र उडवून दिला आहे.
अजित पवार यांच्या मातोश्रींची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मी आशा काकी यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. घरात फक्त मी आणि काकीच होतो. मी केवळ त्यांची भेट घेतली व बाहेर पडले, असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांना तुम्ही अजित पवारांच्या घरी अचानक कसे आलात? असा प्रश्न केला असता त्यांनी हे माझ्या काका, काकींचे घर आहे. माझे बालपण याच घरात गेले आहे. मी येथे दोन-दोन महिने राहिले. त्यावेळी माझे आईशीही बोलणे होत नव्हते. जेवढे माझ्या आईने माझे केले, तेवढेच माझ्या सर्व काकींनी माझ्यासाठी केले, असेही सुप्रिया सुळे यावेळी बोलताना म्हणाल्या.
Supriya Sule confused the entire Maharashtra !