लाडकी बहीण-भावात पुन्हा वादाची ठिणगी…अजितदादांशी भिडल्या सुप्रिया सुळे…!
जळगाव टुडे । लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आमनेसामने उभ्या ठाकल्या होत्या. त्यामुळे वैयक्तिक शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मोठे वितुष्ठ देखील निर्माण झाले होते. दरम्यान, अटीतटीच्या लढतीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारल्यानंतर बारामतीमध्ये उठलेला धुरळा कुठे शांत झाला होता. तेवढ्यात बहीण आणि भावात पुन्हा वादाची ठिणगी पडली असून, अजित दादांनी अर्थसंकल्पात सादर केलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना त्याला निमित्त ठरली आहे. ( Supriya Sule )
राज्य सरकारने सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात महिलांना दरमहा १५०० रूपये देण्याची तरतूद असलेल्या लाडकी बहीण योजनेची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. त्यावर टीका करताना खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांनाही टोला लगावला आहे. ”विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे सध्या त्यांना लाडकी बहीण-भाऊ हे सगळे आठवू लागले आहेत. उशीरा का होईना सरकारला जाग आलेली असली तरी योजनेमध्ये खूप त्रुटी आहेत. त्याचा अभ्यास आम्ही करत आहोत. परत याबाबतची भूमिका आम्ही स्पष्ट करू. जुमलांचा पाऊस हा बजेटमधून अपेक्षितच होता. त्यामुळे वेगळे काही या बजेटबाबत वाटत नाही”, असेही सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.
देवेंद्र फडणवीस यांच्यावरही साधला निशाणा
सुप्रिया सुळे यांनी पती सदानंद सुळे यांच्यासोबत रविवारी तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी सुद्धा संवाद साधला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे, असे साकडे त्यांनी विठुरायाला घातले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी बीडमधील परळीमध्ये झालेल्या सरपंच हत्या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. राज्यातील क्राइम रेट सध्या वाढला आहे. त्यावर गृह मंत्रालयाचे नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे संबंध महाराष्ट्रभर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे’, असे देखील सुप्रिया सुळे म्हटल्या.