जळगावच्या माजी जिल्हाधिकारी सुजाता सौनिक बनल्या राज्याच्या मुख्य सचिव…!
जळगाव टुडे । सुजाता सौनिक यांच्याकडे आता राज्याच्या मुख्य सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्य सचिवपदी प्रथमच एका महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचे पती मनोज सौनिक हे देखील यापूर्वी मुख्य सचिव होते. सुजाता सौनिक ( Sujata Saunik ) या १९८७ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्या सन २०२५ मध्ये निवृत्त होणार असल्याने त्यांच्याकडे साधारण वर्षभर हे पद राहील. विशेष म्हणजे सुजाता सौनिक यांनी जळगावच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार एकेकाळी सांभाळला आहे.
सुजाता सौनिक यांचे प्राथमिक, माध्यमिक तसेच महाविद्यालयीन शिक्षण चंदीगडमध्ये झाले आहे. पंजाब विद्यापीठामधून त्यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव गृहमंत्रालय, सरकारच्या सल्लागार सहसचिव अशा महत्त्वाच्या पदावर देखील कारभार सांभाळला आहे. त्या गेल्या तीन दशकांपासून प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत.
१९८७ च्या बॅचमधील गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक तसेच महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार (१९८८) आणि मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल (१९८९) हे मुख्य सचिवपदाचे दावेदार मानले जात होते. मात्र, सुजाता सौनिक यांना राज्य सरकारने मुख्य सचिवपदाची बढती दिली. एकाच पदावर काम करणारे पहिले पती-पत्नी म्हणून देखील सुजाता व मनोज सौनिक यांची ओळख असणार आहे.