लोकसभेची निवडणूक भाजप उमेदवार स्मिता वाघ यांना पडली ‘इतकी’ महाग…!
जळगाव टुडे । लोकसभेची जळगाव जिल्ह्यातील यंदाची निवडणूक अनेक अर्थाने चर्चेचा विषय ठरली. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात महायुतीचा दारूण पराभव झालेला असताना, जळगाव आणि रावेरच्या जागांनी भाजपची शान राखली. त्यानंतर आता उमेदवारांनी केलेल्या खर्चावरून जळगाव जिल्ह्याने परत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण, केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीतून मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ( Smita Wagh )
जळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण १४ आणि रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण २४ उमेदवार उभे होते. संबंधित सर्व उमेदवारांनी निवडणूक कालावधीत केलेल्या खर्चाला केंद्रीय निरीक्षकांनी अंतीम स्वरूप दिले आहे. त्यानुसार जळगावमधून निवडणूक लढलेल्या आणि सुमारे अडीच लाखांच्या मताधिक्याने विजयी झालेल्या खासदार स्मिता वाघ यांनी सर्वाधिक खर्च केल्याचे उघडकीस आले आहे. खालोखाल रावेरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी आणि भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे व करण पाटील-पवार यांनी खर्च केल्याचे दिसून आले आहे.
स्मिता वाघ यांनी किती केला खर्च ?
जळगाव तसेच रावेर मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन निरीक्षकांची नियुक्ती केली होती. त्यांच्याकडून तीन टप्प्यात सर्व उमेदवारांच्या खर्चाची पडताळणी सुद्धा करण्यात आली. गुरुवारी (ता.०४) देयके सादर करण्याची मुदत संपल्यानंतर दोन्ही निरीक्षकांनी खर्चाच्या विवरणावर शिक्कामोर्तबाची मोहोर लावली. त्यानुसार लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जळगावमधील उमेदवार स्मिता वाघ यांचा सुमारे ७७ लाख ४२ हजार ९६४ रूपये एवढा खर्च झाला आहे. तर वाघ यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील-पवार यांचा ५५ लाख ९८ हजार ७४१ रुपये एवढा खर्च झाल्याची माहिती मिळाली आहे.
श्रीराम पाटलांची देखील खर्चात आघाडी
रावेरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांचाही सुमारे ६४ लाख २० हजार १३० रुपये एवढा खर्च झाला आहे. तर महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा ६१ लाख १० हजार ६४८ रुपये एवढा खर्च झाला आहे. दरम्यान, रावेरमध्ये महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे ह्या अडीच लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होऊन आता केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री झाल्या आहेत.