खासदार उन्मेश पाटील ठाकरे गटात जाणार असल्याची चर्चा, काय म्हणाल्या स्मिता वाघ ?

Smita Wagh : भाजपाकडून लोकसभेची दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली नाही म्हणून खासदार उन्मेश पाटील हे नाराज असून, लवकरच ठाकरे गटात जाणार असल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. त्यांच्याशी काही संपर्क झाला आहे का, असा प्रश्न जळगावमधील भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ यांना प्रसार माध्यमांकडून विचारण्यात आला. तेव्हा “उन्मेशदादा किंवा त्यांच्या पत्नी संपदाताई हे दोघे काहीही झाले तरी भारतीय जनता पक्ष सोडून जाणार नाहीत,” असा ठाम विश्वास श्रीमती वाघ यांनी व्यक्त केला.

लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले खासदार उन्मेश पाटील हे जळगावमधील भाजपच्या मेळाव्याला सुद्धा गैरहजर होते आणि मला बैठकीचे बोलावणे वेळेवर मिळाले नव्हते, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना जाहीरपणे सांगितले होते. त्याबद्दल पत्रकारांनी विचारणा केल्यावर स्मिताताई म्हणाल्या की, “ज्या दिवशी माझे लोकसभेचे तिकीट घोषित झाले, त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी उन्मेशदादांना भेटायला गेले होते. त्यांच्या पत्नी संपदाताई आणि माझी एक तासभर चर्चा झाली होती. पाच वर्षांपूर्वी लोकसभेचे तिकीट घोषित होऊनही मला भारतीय जनता पक्षाने आदेश देऊन थांबण्यास सांगितले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मी उन्मेशदादांसोबत कामाला लागले होते. एवढेच नाही तर मी त्यांची सूचक व अनुमोदक देखील होते. मला असे वाटते आता सुद्धा दादांनी मला आश्वासित केले आहे की, ताई काहीही झाले तरी मी पक्ष सोडून जाणार नाही, पक्षासोबत राहील आणि तुमच्या सोबत राहुन 100 टक्के काम करेल. त्यामुळे ते नाराज असल्याच्या किंवा दुसऱ्या पक्षात जाणार असल्याच्या बाहेर ज्या चर्चा चालल्या आहेत त्याला काहीच थारावारा नाही.”

समोर कोणीही उमेदवार असो आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक लढू

खासदार उन्मेश पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील ह्या लोकसभेसाठी ठाकरे गटाच्या उमेदवार असतील, असेही बोलले जात आहे. त्यांनी मुंबईत जाऊन ठाकरेंची भेट सुद्धा घेतल्याचे सांगितले जात आहे. उन्मेश पाटील हे तुमच्या पक्षाचे खासदार आहेत आणि त्यांच्या पत्नी संपदा पाटील तुमच्या विरोधात उमेदवार असतील, कसे पाहता तुम्ही त्याकडे याबद्दलही पत्रकारांनी स्मिता वाघ यांना विचारले. तेव्हा “संपदाताई किंवा उन्मेशदादा भारतीय जनता पक्ष सोडून कुठेही जाणार नाहीत, याचा मला ठाम विश्वास आहे. भारतीय जनता पार्टीने मला स्वतःला खूप काही झोळी भरून दिले आहे. कितीतरी पदे मला 32 वर्षात दिली आहेत. मी तीनवेळा जळगाव जिल्हा परिषद सदस्या होती, जिल्हा परिषदेची अध्यक्षा देखील होते. त्याप्रमाणे उन्मेशदादांनी सुद्धा विधानसभा व लोकसभा लढली आहे. त्यांनाही पक्षाने भरभरून दिले आहे. त्यामुळे ते माझ्या विरोधात तरी उमेदवारी करणार नाहीत. तरीही समोर कोणीही उमेदवार असला तरी आम्ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात लढू,” असे स्मिता वाघ यांनी स्पष्ट केले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button