स्मार्ट मीटरला गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेशात तीव्र विरोध; महाराष्ट्रात मात्र सुरूवात !
जळगाव टुडे । वीज चोरी व गळती रोखण्यासाठी देशभरात सुमारे 25 कोटी स्मार्ट मीटर ( Smart Electric Metre) बसविण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. मात्र, त्यास गुजरात तसेच दिल्ली आणि उत्तर प्रदेशात तीव्र विरोध होताना दिसत आहे. काही ठिकाणी मीटर बसविण्यास स्थगिती देखील मिळाली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील वीज ग्राहकांच्या माथी सदरचे मीटर मारले जात असून, टप्याटप्याने त्याची सुरूवात देखील केली जात आहे.
पहिल्या टप्प्यात दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरातसह इतर राज्यांत स्मार्ट वीज मीटर बसवण्यात आले. परंतु, त्या राज्यातील वीज ग्राहकांनी स्मार्ट मीटरला तीव्र विरोध केला आहे. बसवलेले मीटर काढून घेण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे. मात्र, संबंधित कंपनीने ते काढले नाही म्हणून संतप्त ग्राहकांनी मीटरसह कंपन्यांचे कार्यालय देखील फोडले आहे. स्मार्ट मीटरमुळे दुप्पट बील येते, अशी ग्राहकांची तक्रार आहे. परराज्यात ग्राहकांच्या विरोधानंतर स्मार्ट मीटर बसवणे स्थगित केले आहे. हेच मीटर आता महाराष्ट्राच्या माथी मारले जात आहेत. पुढील महिन्यापासून मीटर बसवण्यास प्रारंभ केला जाणार असून मीटर बसवण्याचे कंत्राट खासगी कंपन्यांना देण्यात आले आहे.
वीज कंपनीचे कार्यालय फोडले
उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात 12 लाख मीटर बसवले होते तसेच गुजरातमधील बडोद्यात 27 लाख स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत. संबंधित ग्राहकांना स्मार्ट मीटरमुळे आता दुप्पट बिल भरावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नागरिकांनी मीटर काढून घ्यावे, असे वीज कंपनीला कळवले होते. परंतु, त्यांनी मीटर काढून नेले नाही. वीज पुरवठा मात्र बंद केला. त्यामुळे नागरिकांनी चिडून अनेक ठिकाणी वीज कंपनीचे कार्यालय फोडल्याचा प्रकार घडला आहे.