Silver Oak : शरद पवारांच्या भेटीला छगन भुजबळ; राजकीय वतुर्ळात उडाली मोठी खळबळ !
Silver Oak : अजित पवार गटाच्या बारामतीमध्ये रविवारी पार पडलेल्या सभेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचे काम काही लोक करत असल्याची टीकाही भुजबळ यांनी तिथे केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आज सोमवारी भुजबळांनी पवारांचे सिल्व्हर ओक हे निवासस्थान गाठून सर्वांना आश्चर्याचा मोठा धक्का दिला आहे. राजकीय वतुर्ळातही त्यामुळे खळबळ उडाली आहे.
Silver Oak
लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले असताना, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बरेच आमदार शरद पवारांच्या संपर्कात आले आहेत. त्यामुळे अजित पवार व शरद पवार गटात तणावाची परिस्थिती सुद्धा निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत अजित पवार गटाने बारामतीत आयोजित केलेल्या सभेत अजित पवारांनी नाही पण छगन भुजबळांनी शरद पवारांवर निशाणा साधण्याची संधी साधली. त्यामाध्यमातून त्यांनी शरद पवारांवर अनेक आरोपही केले. आपल्या त्या विधानानंतर दुसऱ्याच दिवशी सोमवारी सिल्व्हर ओक गाठून भुजबळांनी सर्वांना आश्चर्यचकीत करून सोडले आहे.
दोघांच्या भेटीकडे राज्याचे लक्ष…
छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीचे कारण अजून समोर आलेले नाही. मात्र राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणाचा प्रश्न चांगलाच गाजत असताना दोघांच्या भेटीत तोच मुद्दा चर्चेचा विषय असू शकतो, असे बोलले जात आहे. आदल्या दिवशी टीका केल्यानंतर भुजबळ अचानक पवारांच्या भेटीला पोहोचल्याने अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार हे कोणालाच भेट देत नव्हते. मात्र, छगन भुजबळ्यांना त्यांनी भेटीची वेळ दिली आहे. दोघांमध्ये काय चर्चा होते, त्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.