निवडणूक आटोपली राजकारण संपले…श्रीराम पाटलांचे हे असे वागणे जनतेच्या मनात घर करून गेले !
जळगाव टुडे । निवडणूक काळात मतदारसंघ पिंजून काढणारे आणि पुढील पाच वर्ष सतत संपर्कात राहण्याची हमी देणारे बरेच उमेदवार मतदान आटोपल्यानंतर पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व मतदारांकडे ढुंकुनही पाहत नाहीत. अशीच स्थिती जवळपास सर्वदूर असताना, लोकसभेच्या रावेर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील ( Shreeram Patil) यांनी मात्र निवडणुकीनंतर ठिकठिकाणी पुन्हा मेळाव्यांचे आयोजन करून आपण इतरांपेक्षा निश्चितच वेगळे आहोत, हे दाखवून दिले आहे. त्यांचे हे असे जगावेगळे वागणे अर्थातच जनतेच्या मनात घर करून गेले आहे.
विशेष म्हणजे “आपल्याला कुठेही विरोधासाठी राजकारण करायचे नसून, केवळ समाजसेवेसाठी मी लोकसभेची निवडणूक लढवली. जनतेने देखील आपल्याला भरभरून प्रेम दिले,” अशी भावना श्रीराम पाटील यांनी निवडणुकीची रणधुमाळी थांबल्यानंतर व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या काळात उमेदवार निवडणूक लढत असला तरी पक्षाच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्ते निस्वार्थ भावनेने अविश्रांत मेहनत घेत असतात. त्यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना ठेवून मतदानाची प्रक्रिया आटोपल्यानंतर लगेचच त्यांची भेट घेऊन आभार मानने आपले कर्तव्य आहे, याची जाणीव श्रीराम पाटील यांनी ठेवली आहे. त्याच उद्देशाने त्यांनी रावेर मतदारसंघातील चोपडा, यावल, रावेर, मलकापूर, जामनेर, भुसावळ, बोदवड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यावर सध्या भर दिला आहे. उमेदवार पाटील यांनी संवाद साधल्यानंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते पुन्हा एकदा नव्या उत्साहाने प्रेरीत होत असल्याचेही दिसून येत आहे. राजकीय वर्तुळात श्रीराम पाटील यांच्या या उपक्रमाची चर्चा देखील रंगली आहे.