लोकसभा प्रचारावेळी जन्मगावी रणगावात पाय ठेवताच श्रीराम पाटील झाले भावूक !
जळगाव टुडे । महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीराम पाटील यांचा रावेर तालुक्यात प्रचार दौरा होता. दुपारच्या रणरणत्या उन्हात रावेर तालुक्यातील रणगाव या तापी नदीकाठवरच्या आपल्या जन्मगावी पाय ठेवताच श्रीराम पाटील ( Shreeram Patil) यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिले नाही. खडतर बालपण आठवल्याने त्यांना क्षणभर गहिवरून सुद्धा आले.
श्रीराम पाटील यांच्या रावेर तालुक्यातील प्रचार दौऱ्याला बलवाडी येथून सुरुवात झाली. त्यानंतर सिंगनूर, दसनूर, आंदलवाडी, सुनोदा, गाते, उधळी, रणगांव या गावांना श्रीराम पाटील यांनी भेटी दिल्या. मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांना भरघोस मतांनी निवडून देण्याची विनंती केली. प्रचार दौऱ्यात ते दुपारी रणगाव येथे आले. मामा चिंतामण यादव चौधरी यांच्याकडे लहानपणी ज्या घरात ते राहत असत तिथे येताच त्यांना आपल्या संघर्षाचा भूतकाळ आठवला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. यावेळी शालिक चौधरी, अरुण चौधरी, रमेश कोळी, गणेश पाटील, सतीश कोळी, भागवत चौधरी आणि विजय पाटील या शाळेतील त्यांच्या सवंगड्यांनी त्यांचे स्वागत केले. या संपूर्ण तापी पट्ट्यातून भरघोस मते त्यांना देण्याचे अभिवचन संबंधितांनी दिले. प्रचार दौऱ्यात राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, शिवसेनेचे (उबाठा गट) जिल्हा उपप्रमुख योगीराज पाटील, तालुकाध्यक्ष किशोर पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, राजू सवर्णे, दीपक पाटील, शशांक पाटील, बलवाडीच्या सरपंच वर्षा महाजन, अनिल तायडे, महाविकास आघाडीचे सर्वच पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.