भारतात पुढील काळात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकाच होणार नाहीत !

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली भीती

Jalgaon Today : “राज्यात जिल्हा परिषदेसह पंचायत समित्या आणि नगरपरिषदांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून होऊ शकलेल्या नाहीत. आणखी काही दिवसांनी कदाचित लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होणार नाहीत”, अशी भीती शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवताहेत, ते पाहून आपल्याला चिंता वाटत असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे.

सासवड येथे बारामती मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत श्री.पवार बोलत होते. “अब की बार 400 पारचा नारा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खासदारांची संख्या वाढवायची आहे आणि देशाची राज्यघटना बदलायची आहे, असा आरोप देखील शरद पवार यांनी आपल्या भाषणातून केला. यंदाची लोकसभा निवडणूक वेगळी आहे. हा देश कोणत्या पद्धतीने चालवायचा हा प्रश्न आहे. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवतात, ते पाहता आम्हाला चिंता वाटू लागली आहे. लोकशाहीच्या मार्गाने म्हणजेच लोकांच्या सहमतीने देश चालवणे, ही लोकशाहीची गरज आहे. स्थानिक पातळीवर लोकशाही दिसत नाही”, असेही पवार यांनी भाषणातून म्हटले.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांचेही यावेळी भाषण झाले. त्या म्हणाल्या की, ‘काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत असणाऱ्या पक्षाला माझ्या विरोधात एक उमेदवार देता आला नाही. माझ्याच घरातील महिलेला माझ्याविरोधात उभे केले. दिल्लीतून विलंब झाल्याने पुरंदरमध्ये अद्याप विमानतळ झालेला नाही. खेड तालुक्यात होत नसल्याने मी पुरंदर येथे विमानतळ आणला. मी आणि संजय जगताप यांनी 50 पेक्षा जास्त बैठका घेतल्या. मात्र, विमानतळ पुरंदरमध्येच होईल, बाकी कुठेही होऊ देणार नाही.’

WhatsApp Group

Related Articles

Back to top button