कर नाही त्याला कशाचा डर ? शशिकांत शिंदेंना अटक होण्याच्या भितीने शरद पवारांचा मात्र थेट मोदींना इशारा

Jalgaon Today : महाविकास आघाडीचे साताऱ्यातील उमेदवार शशिकांत शिंदे हे मुंबई बाजार समितीमधील एका प्रकरणामुळे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दरम्यान, त्यांना अटक होण्याच्या भीतीने प्रत्येक तालुक्यात संघर्ष उभा करण्याचा इशारा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आता थेट नरेंद्र मोदींनाच दिला आहे. तसेच शिंदेंना निवडणुकीत थांबविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचा आरोप देखील पवार यांनी केला आहे. दरम्यान, शशिकांत शिंदे हे जर खरोखर निर्दोष असतील तर पवारांनी त्यासाठी एवढा राईचा पर्वत करण्याची गरजच काय आहे, असा प्रश्न जनसामान्यांमधून आता उपस्थित होत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात साताऱ्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे हे कसे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत, हे पटवून देतानाच त्यांना अडकविण्यासाठी भारतीय जनता पार्टी त्यांच्या मागे लागल्याचा मुद्दा शरद पवारांच्या जाहीर सभांमधील प्रमुख मुद्दा सध्या बनला आहे. शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ पाटणमध्ये आयोजित सभेतही त्याची प्रचिती आली. यावेळी ”शशिकांत शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. काहीना काही करून शिंदेंना अडवायचे कसे हे भाजपचे असलेले सूत्र धोक्याचे आहे. महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यामध्ये संयमाने, लोकशाहीच्या माध्यमातून संघर्ष केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा अन्याय आणि अत्याचार महाराष्ट्र सहन करणार नाही”, असाही इशारा पवार यांनी थेट मोदींना दिला. तसेच सध्या देशात राजकीय अराजकता माजली असून पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचा कालखंड देशासाठी हानीकारक ठरलेला असल्याने त्यांना देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार नाही”, असा हल्लाबोल देखील शरद पवार यांनी सभेत चढवला.

दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनीही भाजपवर अनेक गंभीर आरोप केले. ”ही निवडणूक त्यांच्या हातातून गेल्यामुळे हे असले प्रयत्न सुरू आहेत. आणखी तिसरा गुन्हा दाखल होण्याची वाट मी पाहतोय, असेही शिंदे म्हणाले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button