शरद पवारांनी पाच वर्षांपूर्वी अशी कोणती चूक केली होती ?, ज्याचा त्यांना आजही होतो पश्चाताप
Sharad Pawar : देशाचे माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गेल्या अनेक वर्षांपासून देशासह राज्याच्या राजकारणात कार्यरत आहेत. कोणत्याही क्षणी चक्र फिरवून होत्याचे नव्हते आणि न होत्याचे होते करण्याची क्षमता त्यांच्यात असल्याने त्यांना बऱ्याचवेळा राजकारणातले चाणक्य देखील म्हटले जाते. मात्र, एवढे कौशल्य अंगी असतानाही पाच वर्षांपूर्वी आपल्या हातून एक मोठी चूक झाल्याची कबुली त्यांनी दिली आहे आणि त्याबद्दल आपल्याला पश्चाताप होत असल्याची खदखद देखील त्यांनी व्यक्त केली आहे. (Jalgaon Today)
अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता.22) सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बोलताना शरद पवार यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर थेट निशाणा साधला. “पाच वर्षांपूर्वी मी एक चूक केली होती. त्याबद्दल मी आज अमरावतीच्या मतदारांची माफी मागतो. ज्यांना पाठिंबा दिला त्यांना लोकांनी माझ्या शब्दावर खासदार केले. आज या ठिकाणी मी एक गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे. मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे. माझ्याकडून पाच वर्षांपूर्वी एक चूक झाली. पाच वर्षापूर्वी जी निवडणूक झाली, तेव्हा त्या निवडणुकीतील उमेदवाराला मतदान करा म्हणून मी जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला आणि त्यांना खासदार केले. पण गेल्या पाच वर्षातील त्यांचा अनुभव पाहिल्यावर माझ्या मनात अस्वस्थता होती. कधी अमरावतीकरांना आमच्याकडून चूक झाली हे सांगावे असे मला वाटत होते. आता ती चूक पुन्हा कधी होणार नाही. झालेली चूक आता दुरुस्त करायची आहे. त्यासाठी बळवंत वानखेडे यांना विजयी करा”, असे आवाहन शरद पवारांनी केले.