लेकीसाठी भाषण करत असतानाच शरद पवारांच्या दिशेने आली अचानक एक वस्तू
अंगरक्षकाने प्रसंगावधान राखून झेल घेतल्याने टळला पुढील अनर्थ
Sharad Pawar : लोकसभेच्या बारामती मतदारसंघाची जागा शरद पवार व अजित पवार गटाने यंदा खूपच प्रतिष्ठेची केली आहे. अशा या परिस्थितीत शुक्रवारी (ता.19) सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आल्यानंतर शरद पवार भाषणासाठी उभे राहिले आणि अचानक एक वस्तू त्यांच्या दिशेने भिरभिर करीत आली. सुदैवाने त्यांच्या एका अंगरक्षकाला घडला प्रकार लक्षात आला, त्याने प्रसंगावधान राखून ती वस्तू हवेतच पकडली. पवारांचे लाईव्ह भाषण सुरु असतानाच सदरचा प्रकार घडल्याने ते दृश्य सर्वदूर व्हायरल देखील झाले.
कन्हेरी येथील मारूती मंदिरावर प्रचार नारळ फोडल्यानंतर शरद पवारांचे भाषण नुकतेच कुठे सुरू झाले होते. दरम्यान, समोर बसलेल्या उपस्थितांमधून कोणीतरी त्यांच्या दिशेने एक वस्तू फेकली. पवारांच्या अंगरक्षकाने क्षणाचाही विलंब न लावता ती वस्तू हवेतच पकडली आणि संताप व्यक्त केला. अंगरक्षकाच्या चेहऱ्यावरील हावभाव लक्षात घेत क्षणभर शरद पवार हे देखील थबकले. परंतु, समोरून फेकण्यात आलेली वस्तू दुसरी तिसरी काही नसून लीपर माईक होता, हे लगेचच सर्वांच्या लक्षात आले. त्यामुळे शरद पवारांच्या निकटवर्तीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, अशा पद्धतीने माईक भर सभेत फेकून मारणे एकदम चुकीचे असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या.
दरम्यान, कन्हेरी गावाशी संबंधित अनेक जुन्या आठवणींना शरद पवार यांनी आपल्या भाषणात उजाळा दिला. त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचा जन्म आणि विवाह देखील कन्हेरी गावातच झाल्याची आठवण त्यांनी यावेळी आवर्जून सांगितली. त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्यांची नावे तोंडपाठ सांगून कन्हेरी गावाविषयीची आपुलकी देखील त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिली.