रावेरच्या जागेसाठी एकनाथ खडसेंच्या परिवारात भांडणे लावण्यात शरद पवारांना सपशेल अपयश

ठाकरे गटाला जागा सोडण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता

Sharad Pawar : लोकसभेच्या रावेर मतदारसंघात विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना भाजपाकडून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानंतर, त्यांच्या विरोधात तगडा प्रतिस्पर्धी उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुरू होता. त्यासाठी रक्षा खडसेंचे सासरे एकनाथ खडसे तसेच नणंद रोहिणी खडसे यांनाही विचारणा झाली. प्रत्यक्षात खडसे परिवारात भांडणे लावण्यात शरद पवारांना सपशेल अपयश आले असून, त्यांच्यावर सदरची जागा बहुधा ठाकरे गटाला सोडण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

भाजपकडून लोकसभेच्या रावेर मतदारसंघात यावेळी रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नाही, अशी शक्यता गृहीत धरून विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. संभाव्य उमेदवारांची चाचपणी देखील त्यांनी करून ठेवली होती. प्रत्यक्षात भाजपाच्या दुसऱ्या यादीत रक्षा खडसेंचे नाव आले आणि शरद पवार गटाचे सर्व फासे उलटे पडले. अशा या विपरित परिस्थितीत रावेरची जागा बळकावण्याच्या उद्देशाने शेवटी रक्षा खडसेंच्या परिवारातीलच एखाद्या व्यक्तीला तिकीट देण्याच्या दृष्टीने सूत्रे हलविण्यात आली. रक्षा खडसेंच्या विरोधात त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांना उभे केल्यास रावेरची जागा आरामात आपल्याला मिळेल, अशी आशा राष्ट्रवादी शरद पवार गटाला होती. परंतु, सुनेच्या विरोधात उमेदवारी करण्याच्या मानसिकतेत नसलेल्या एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीचा प्रस्ताव सपशेल नाकारला. त्याकरीता स्वतःच्या तब्येतीचे कारण त्यांनी सोयीस्करपणे पुढे केले. त्यामुळे मोठा हिरमोड झालेल्या शरद पवार गटाने त्यांचा मोर्चा रक्षा खडसे यांच्या नणंद रोहिणी खडसे यांच्याकडे वळविला. दुर्दैवाने रोहिणी खडसे यांनीही आपण मुक्ताईनगरच्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे सांगून लोकसभेची निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शविली.

रावेरमध्ये बारामतीचा भांडगळी पॅटर्न न चालल्याने पवार गटाचा नाईलाज
लोकसभेच्या भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या विरोधात त्यांच्याच परिवारातील दुसऱ्या उमेदवाराला तिकीट देऊन रावेरची जागा जिंकण्याचा मनसुबा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा होता. त्यासाठी बारामतीचा भांडगळी पॅटर्न राबविण्याची व्यूहरचना देखील त्यांच्याकडून करण्यात आली होती. परंतु, एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे त्या पॅटर्नला अजिबात बळी पडल्या नाहीत. राजकारणासाठी परिवारात भांडणे वाढणार नाहीत, याची काळजी बाप व लेकीने बरोबर घेतली. रावेरमध्ये बारामतीचा भांडगळी पॅटर्न न चालल्याने शरद पवार गटाचा शेवटी नाईलाज झाला. तुल्यबळ प्रतिस्पर्धी उमेदवार समोर न राहिल्याने रक्षा खडसेंचा विजय कोणीच थांबवू शकणार नाही, हे लक्षात घेऊन रावेरची जागा आता मित्रपक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला स्वखुशीने सोडण्याची तयार देखील शरद पवार गटाने चालविली असल्याचे बोलले जात आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button