शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया…. खिशात ७० रुपये असतील तर १०० रुपये कसे खर्च करणार ?

जळगाव टुडे । लोकसभेच्या निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर हादरलेल्या महायुती सरकारने विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अतिरिक्त अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला. त्यावर जेष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी आता मोठी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या खिशात ७० रुपये असतील तर मी १०० रुपये कसे खर्च करणार? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच आदल्या दिवशीच अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप देखील त्यांनी केला. शनिवारी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते माध्यमांशी बोलत होते.

तुमच्याकडे महसुली जमा रक्कम किती आहे? दुसरे म्हणजे महसुली खर्च किती होणार आहे? जमेपेक्षा खर्चाची रक्कम अधिक असताना खर्चाचा फरक कसा भरणार? याची तरतूद न करता खर्च करणार म्हटले आणि विचारपूर्वक केल्याचा दावा केला तर त्याला फारसा काही अर्थ राहात नाही, असेही शरद पवार अर्थसंकल्पाविषयी बोलले. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या मी नवखा नाही या विधानाचाही समाचार घेतला. या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी कितपत होईल, याची शंका असल्याचेही शरद पवार म्हणाले.

हा अर्थसंकल्प लोकांना आम्ही काहीतरी भयंकर करतोय असे दाखवणारा…
“महायुती सरकारने सादर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात प्रत्यक्ष कृतीत न येणाऱ्या गोष्टींची तरतूद करण्यात आली आहे. संपूर्ण अर्थसंकल्प तीन महिन्यांनी होणारी विधानसभा निवडणूक लक्षात ठेवून मांडला आहे. सर्व तरतुदी लोकांपर्यंत पोहोचायला कित्येक महिने लागतील. तरतूद कमी रकमेची करायची आणि प्रत्यक्षात अधिक रक्कम देण्याचे सूचवायचे. म्हणजे जमा, महसुली तूट आणि लागणारी आवश्यकता या गोष्टींचे आकडे पाहिले तर आवश्यकतेपेक्षा कितीतरी कमी निधीची उपलब्धता आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प लोकांना काहीतरी भयंकर करतोय असे दाखवणारा आहे. पण माझी खात्री आहे की लोकांचा यावर विश्वास बसणार नाही,” असे देखील शरद पवार यांनी नमूद केले.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button