अजित पवार गटातील आमदारांच्या घरवापसीला अखेर शरद पवारांची संमती ?
जळगाव टुडे । लोकसभेत मोठी हार पत्करावी लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काही आमदार आता घरवापसी करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यासंदर्भातील वक्तव्य आमदार रोहित पवार यांनीही मागे केले होते. दरम्यान, खुद्द शरद पवार यांनी राष्ट्रवादी सोडून गेलेले काहीजण पुन्हा पक्षात आले तर घेणार का, असा प्रश्न विचारला गेल्यावर मोठे विधान केले आहे. त्यावरून त्यांची घरवापसी करणाऱ्यांना सूचक संमती असल्याचा अर्थ देखील काढला गेला आहे. ( Sharad Pawar )
लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यातील ३० जागा जिंकून महायुतीच्या नाकात चांगलाच दम आणला होता. विशेषतः अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लाजीरवाण्या पराभवाचे तोंड पाहावे लागले. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत आपली आणखी वाईट अवस्था होऊ नये म्हणून अजित पवार गटातील काही आमदार शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याच्या बातम्या त्यामुळे चर्चेत आल्या आहेत. याविषयी स्वतः शरद पवारांना पत्रकारांनी वेळोवेळी प्रश्न सुद्धा विचारले आहेत. अर्थात, त्याविषयी उत्तर देताना पवारांनी थोडी सावधच भूमिका घेतल्याचा प्रत्यय आलेला आहे. मात्र, आता त्यासंदर्भात पुन्हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी केलेल्या विधानावरून अजित पवार गटाच्या लोकांविषयी त्यांच्या मनात थोडी सहानुभूती निर्माण झाल्याचे जाणवू लागले आहे.
काय म्हणाले आहेत शरद पवार ?
विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित पवार गटातील काही आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचे सांगितले जात आहे. त्याविषयी बोलताना “सरसकट निर्णय घेणे कितपत योग्य आहे, याबाबत मला माहिती नाही. मात्र, पक्षाला मदत होत असेल तर सहकाऱ्यांना विचारून निर्णय घेऊ. मात्र, इकडे येण्यास इच्छुक असलेल्यांचे योगदान आणि भूमिका बघून निर्णय घेतला जाईन”, अशी सूचक प्रतिक्रिया शरद पवारांनी पत्रकारांनी बोलताना दिली.