अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुढे भविष्य काय ? शरद पवार स्पष्टच बोलले !
जळगाव टुडे । लोकसभा निवडणुकीच्या धक्कादायक राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत मिळाले आहेत. दुसरीकडे मूळ राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेले काही आमदार पुन्हा शरद पवारांकडे येण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत फक्त एकच उमेदवार निवडून आल्याने अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढे भविष्य काय ?, असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. (Sharad Pawar)
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री तसेच अजित पवारांना उपमुख्यमंत्री बनविण्याची खेळी भारतीय जनता पार्टीने राज्यात केली. दोघांना सोबत घेऊन नुकतीच पार पडलेली लोकसभेची निवडणूक देखील लढली. प्रत्यक्षात मूळ पक्षातून बाहेर पडलेल्यांना मतदारांनी स्वीकारलेच नाही. उलट महायुतीच्या गेल्या वेळी निवडून आल्या होत्या, तेवढ्याही जागा यावेळी निवडून आल्या नाही. सर्वाधिक वाईट परिस्थिती अजित पवारांच्या राष्ट्रवादीची झाली. त्यांच्या गटाचा जेमतेम एकच खासदार निवडून आला, तो देखील स्वतःच्या कर्तृत्वावर. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे भविष्य काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पुढे होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा निभाव लागणे खूपच कठीण दिसत आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एकमेव खासदार सोबत आला तर त्याला सोबत घ्याल का, असे विचारण्यापेक्षा एनडीएचे खासदार तुमच्याबरोबर आले तर त्यांना घेणार का, असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवारांना विचारला. तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे भविष्य काय, असेही माध्यमांनी विचारले. तेव्हा “आज इंडिया आघाडीची बैठक आहे. ती होऊ द्या त्यानंतर मी तुम्हाला याबाबत ठामपणे सांगू शकतो. तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे भविष्य काय ते मी सांगू शकत नाही, मला ठाऊक नाही,” असे शरद पवारांनी स्पष्ट केले.