शरद पवार लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टीसोबत जाणार ?

Jalgaon Today : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हे कधी काय करतील आणि कुठे काय बोलून जातील, याबद्दल कोणीच काही सांगू शकत नाही. सन 2014 मध्येही कोणाच्या ध्यानी मनी नसताना त्यांनी भारतीय जनता पार्टीला पाठींबा दर्शवून खळबळ उडवून दिली होती. आता देखील ते लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपासोबत जाणार असल्याचे बोलले जात आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यापूर्वी एकदा भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर पवार हे भाजपबरोबर जाणार नाहीत, याची खात्री काय? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनीही उपस्थित केला आहे. शरद पवार यांची मैत्री काँग्रेसबरोबर असली तरी लोकसभा निवडणुकीनंतर ते भारतीय जनता पार्टीसोबत असतील, असेही श्री.आंबेडकर यांनी म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. अन्वर शेख यांच्या प्रचारार्थ आंबेडकर यांची सभा हडपसरमधील कन्यादान मंगल कार्यालयात झाली. त्यावेळी त्यांनी शरद पवारांच्या भाजपासोबत जाण्याविषयी वक्तव्य केले.

शरद पवारांचे पुतणे अजित पवार हे आधीच भाजपासोबतच्या सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यावरून काका आणि पुतण्या यांच्यात मोठे वितुष्ठ निर्माण झाले असून, बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या अटीतटीची लढत रंगली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. सर्वाधिक चर्चेच्या ठरलेल्या या मतदारसंघातील प्रचार तोफा रविवारी थंडावल्या. बारामतीमधील 23 लाख 72 हजार मतदार उद्या 07 मे रोजी शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे भवितव्य ठरवणार आहे. पवार कुटुंबातील या राजकीय लढाईसाठी शरद पवार वयाच्या 84 वर्षीय सक्रीय आहे.

WhatsApp Group

Related Articles

Back to top button